Tarun Bharat

काणकोणातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा

Advertisements

काँग्रेस समितीचे मामलेदारांना निवेदन : खात्याच्या अधिकाऱयांना घेराव घालण्याचा इशारा

प्रतिनिधी / काणकोण

एका बाजूने कोरोना महामारीपासून बचावासाठी चालू असलेला लॉकडाऊन त्यातच पिण्याच्या पाण्याच्या समस्येने काणकोणची जनता हैराण झालेली असून पाणीपुरवठा खात्यातील अधिकारी हा प्रश्न सोडवायला असमर्थ ठरले असल्याचा स्पष्ट आरोप काणकोणच्या काँग्रेस समितीने केला आहे. आज सोमवार 27 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर खात्याच्या अधिकाऱयांना घेराव घालतानाच तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. काँग्रेसच्या राज्य समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, महादेव देसाई, प्रलय भगत, सर्वानंद कोमरपंत यांच्या सहय़ा असलेले एक निवेदन यासंदर्भात मामलेदार विमोद दलाल यांना देण्यात आले आहे.

काणकोण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या ही नित्याचीच गोष्ट बनलेली असून या खात्यामधील साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यात समन्वय नसल्याचा हा परिणाम आहे. जो तो आपली जबाबदारी दुसऱयावर झटकून टाकत असल्याचे दिसत आहे. जादा क्षमतेच्या जलवाहिन्या, जादा एमएलडीच्या टाक्या पुरवून देखील या भागातील जलवाहिन्या वारंवार फुटत असतात. काही ठिकाणी सतत 24 तास भरपूर पाण्याचा पुरवठा होत असतो, तर काही ठिकाणच्या जलवाहिन्या कोरडय़ा पडलेल्या असतात, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

अभियंत्यांकडून जबाबदारी झटकण्याचे प्रकार

या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी ज्या अभियंत्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकतात आणि पाणी सोडण्यासाठी जे कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत ते बिचारे बळीचे बकरे ठरतात अशी काणकोणची सद्यपरिस्थिती आहे. काही भागांमध्ये दोन दिवसांआड पाणी सोडले जाते. मात्र त्यात एकसूत्रता नाही. ज्या दिवशी पाणी सोडले जाते त्या दिवशी ते अर्ध्या तासातच बंद केले जाते अशी अवस्था आहे, असे काँग्रेस समितीने म्हटले आहे.

सर्वत्र जलवाहिन्या, टाक्या बसविण्यात आलेल्या असताना केवळ अधिकाऱयांच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम काणकोणवासियांना भोगावा लागत आहे. या तालुक्यात खाणारी तोंडे वाढलेली आहेत. त्यामुळे याआधीच पाण्याच्या पुरवठय़ाच्या बाबतीत नियोजन करायला हवे होते. मात्र काणकोणातील खात्याचे अधिकारी यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका सदर समितीने केली आहे.

टँकरने पुरवठा करण्याची पाळी

सध्या खोतीगाव, गावडोंगरी, पैंगीण, लोलये, श्रीस्थळच्या काही भागांमध्ये टँकर्सच्या साहाय्याने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. हा पुरवठा करणाऱयांना सकाळी 6 पासून कामाला लागावे लागते. एकेका टँकरचालकाला दिवसाला आठ-आठ खेपा माराव्या लागतात, अशी माहिती एक टँकरचालक रमाकांत कोमरपंत यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आपण न कंटाळता हे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबतीत एप्रिल महिन्यात ही अवस्था, तर मे महिना कसा काढायचा असा सवाल काँग्रेस समितीने केला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, मुख्य सचिव, मुख्य अभियंता, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, काणकोणचे उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या प्रश्नावर रस्त्यावर यावे लागले, तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा समितीने दिला आहे.

Related Stories

आरपीआयचा भाजपला पाठिंबा : रामदास आठवले

Amit Kulkarni

सांखळीत भाजपविरोधक टिकणारच नाही

Amit Kulkarni

दुसरा डोस त्वरित घ्या

Amit Kulkarni

मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा

Amit Kulkarni

गांवरावाडा कळंगुटातील निर्माणाधिन हॉटेल प्रकल्पास दिलेला परवाना बेकायदा

Amit Kulkarni

फोंडय़ाच्या विकासाचा दहा कलमी कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!