Tarun Bharat

काणकोण तालुक्यातील काही भाग अजूनही अंधारात

Advertisements

पोळे, लोलये, मार्ली, तिर्वाळ भागांतील वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी, सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित राहण्याचा प्रसंग प्रथमच

प्रतिनिधी / काणकोण

तौक्ते चक्रीवादळाच्या माऱयाने काणकोण तालुक्यात वीज खात्याची अतोनात हानी झाली असून अजूनही या तालुक्यातील पोळे, लोलये, मार्ली, तिर्वाळ भागांतील वीजपुरवठा सुरू झालेला नाही. या तालुक्याच्या विविध भागांतील मिळून 40 पेक्षा अधिक वीजखांब मोडलेले आहेत, वीजवाहिन्या तुटलेल्या आहेत. पोळे येथून विजेचे खांबे आयात करायचे म्हटल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हे काम अडून पडले असल्याची माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता संतोष लोलयेकर यांनी दिली. काणकोण तालुक्यासाठी आवश्यक असलेले वीज केबल्स तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

15 रोजी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झालेला असून काणकोण तालुक्याच्या इतिहासातील सतत चार दिवस वीजपुरवठा बंद राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा अनुभव कित्येक नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना मांडला. गोव्यात जे कोकणी-मराठी राजभाषा आंदोलन झाले होते त्यावेळी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असे मत काणकोणचे एक तियात्रिस्ट रमेश कोमरपंत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर वीज खात्याच्या कर्मचाऱयांनी अहोरात्र झटून मोडलेले खांबे उभे करणे, वीजवाहिन्या पूर्ववत जोडण्याचे जे काम केले आणि बऱयाच भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याचे कौतुक व्हायला हवे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

फोन सेवा खंडित झाल्याने गोची

या चक्रीवादळात प्रचंड प्रमाणात झाडे रस्त्यांवर, काहींच्या घरांवर पडली. त्यामुळे वाहतूक खोळंबली. रस्त्यांवरील झाडे बाजूला करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी काणकोणच्या अग्निशामक दलाने केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे फोन सेवा खंडित झाली. ऑनलाईन शिक्षणाचा जसा बोजवारा उडाला त्याचप्रमाणे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे घरी राहून जे कर्मचारी काम करत होते त्यांची पंचाईत झाली. इतर भागांकडील संपर्कच तुटला. त्याचबरोबर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या सहाय्यासाठी ज्या कोविड योद्धय़ांची या तालुक्यात नेमणूक करण्यात आली आहे त्यांचा आणि कोरोना रुग्णांचा दोन दिवस संपर्कच तुटला. या तालुक्यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी मिळून 32 कोविड योद्धे सध्या स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत, अशी माहिती एक कोविड योद्धे व्यंकटराय नाईक यांनी दिली.

आगोंदमधील शॅक्सना तडाखा

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कित्येक विक्रेत्यांकडील दूध, भाजीपाला, मांस, मासळी कुजून गेली. पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला. यावेळी कोरोना महामारीचा काही क्षण विसर पडला, असे मत दिवाकर भगत यांनी व्यक्त केले. या वादळाचा सर्वाधिक फटका आगोंद येथील हंगामी शॅक्सचालकांना बसला आहे. या किनाऱयावरील हंगामी शॅक्सची छपरे त्याचप्रमाणे तंबूंवरील आच्छादने वाऱयाने उडून गेली आहेत. कित्येक ठिकाणी घरांत आणि आस्थापनांत पाणी शिरले आहे, अशी माहिती आगोंदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी दिली. त्याचबरोबर कोणत्याच ठिकाणी सुदैवाने जीवितहानी झाल्याची नोंद नसल्याची माहिती माजी नगरसेवक दिवाकर पागी यांनी दिली.

दरम्यान, जे काणकोणच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीला जमले नसते ते धोकादायक झाडे आणि अन्य वस्तू बाजूला सारण्याचे काम तौक्ते चक्रीवादळाने बऱयापैकी केलेले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात तरी काणकोण तालुक्यात अखंडित वीजपुरवठा होणार, अशी आशा बऱयाच जणांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

Amit Kulkarni

राज्यात शनिवारपर्यंत पावसाची शक्यता

Amit Kulkarni

बुधवारी 136 कोरोनाबधित

Patil_p

आसगावात दोन ‘हट’ जाळून खाक

Omkar B

समिल वळवईकर यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

डिचोलीत लॉकडाऊनची कडक व यशस्वी अंमलबजावणी.

Amit Kulkarni
error: Content is protected !!