Tarun Bharat

काबूल स्फोटामागे ‘आयएस’चा हात

हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानशी संबंध- मृतांचा आकडा शंभरीपार

काबूल / वृत्तसंस्था

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला असून, यात 13 अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या 18 अमेरिकन सैनिकांना विशेष विमानाने अफगाणिस्तानच्या बाहेर हलवले जात आहे, असेही अमेरिकन लष्कराकडून सांगण्यात आले. दरम्यान, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट-खुरासान प्रोव्हिएन्सने (आयएस-केपी) या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली असून, हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, या स्फोटांनंतरही अमेरिका आपले स्थलांतरण ऑपरेशन थांबवणार नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांचे निर्वासन सुरूच राहील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे.

काबूल विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार घडला होता. अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केलेले अनेक जण यात बळी पडले आहेत. तसेच सुरक्षा बंदोबस्ताला असलेले अमेरिकन जवानही यात बळी पडल्याने अमेरिकेचे स्थानिक सुरक्षा अधिकारीही धास्तावलेले दिसून आले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचेही 28 जण आहेत असे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर भीती व्यक्त करतानाच आम्हाला आता अधिक हल्ल्यांसाठी तयार राहिले पाहिजे. आमच्या अफगाणिस्तानातील आस्थापनांवर रॉकेट हल्लेही होण्याचा धोका आहे, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल प्रँक मॅकेन्झी यांनी म्हटले आहे.

अमेरिकन अध्यक्षांचा दहशतवाद्यांना इशारा

काबूलमधील बॉम्बहल्ल्याची जबाबदारी ‘आयएसआयएस’च्या एका गटाने स्विकारली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवादी संघटनांना धमकीवजा इशारा दिला आहे. ‘आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करू’ असे बायडेन यांनी म्हटले आहे. ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी वेळीच सावध व्हावे, असेही ते पुढे म्हणाले.

पाकिस्तानमधून कारनामे

‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिएन्स’चा प्रमुख मावलावी अब्दुल्ला उर्फ अस्लम फारुकी याच्या आदेशावरून काबूल विमानतळावर हल्ला घडवण्यात आला आहे. अस्लम फारुकीचे यापूर्वी लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते. त्यानेच हक्कानी नेटवर्कच्या साथीने काबूल आणि जलालाबादमध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहेत. फारुकीचा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशीही संबंध असल्याची माहिती आहे. अस्लम फारुकी हा एक पाकिस्तानी आहे. गेल्या वषी काबूलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी होता.

स्फोटानंतर शेकडो लोकांची कोंडी

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेकांनी मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडला आहे. मात्र अजूनही बरेच लोक काबूल विमानतळावर अडकून पडले आहेत. अफगाणिस्तानातून पलायनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झालेल्या काबूल विमानतळावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी आधीच व्यक्त केली होती. अमेरिकी दुतावासाने बुधवारी रात्री काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांजवळ न थांबण्याची सूचना आपल्या नागरिकांना केली होती. तथापि, अफगाणबाहेर पडू इच्छिणारे शेकडो लोक या शक्तिशाली स्फोटानंतर अडकून पडले आहेत. सध्या हे लोक जीव मुठीत धरून स्वतःचा बचाव करत आहेत.

Related Stories

भारतीय विद्यार्थी युक्रेन लष्करात कार्यरत; आई म्हणते…

Archana Banage

इस्त्रायलची जर्मनीकडून पाणबुडय़ांची खरेदी

Patil_p

वेगन डिश, परंतु चव नॉनव्हेजसारखी

Patil_p

चीनसमोर झुकणार नाही – तैवान

Patil_p

ब्रिटिश एअरवेज करणार 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात

datta jadhav

आशियाई विकास बँकेची भारताला 16 हजार 500 कोटींची मदत

prashant_c