Tarun Bharat

कायद्यातील बदलांचा शेतकऱयांनाच फायदा

पंतप्रधान मोदींचा दावा : नव्या कृषी कायद्याचे पुन्हा एकदा जोरदार समर्थन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा शेतकरी कायद्याचे समर्थन करत तिन्ही नवे कायदे शेतकऱयांच्या फायद्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या कायद्यांनी शेतकऱयांना पर्याय वाढणार आहेत. तसेच शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी फिक्कीच्या 93 व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडून करण्यात आलेल्या नव्या कायद्यांची जोरदार पाठराखण केली.

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱयांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. देशात कोल्ड स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर आधुनिक होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे, असे मोदी म्हणाले. शेतकऱयांना जेवढा पाठिंबा मिळेल, आपण जेवढी गुंतवणूक करू, तेवढाच देश आणि शेतकरी मजबूत होईल. सरकारला आपला हेतू आणि धोरणासह शेतकऱयांचे हित हवे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या 93 व्या वार्षिक बैठकीला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना कोरोना महामारीच्या काळात भारताने आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवल्याचा दावाही त्यांनी केला.

आज भारताचे कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा जास्त व्यापक झाले आहे. आज शेतकऱयांजवळ आपले उत्पादन कुठेही विकण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ते डिजिटल माध्यमातूनही खरेदी-विक्री करू शकतात. शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. कृषी क्षेत्रातील सुधारणांचा सर्वाधिक फायदा शेतकऱयांनाच होणार आहे. कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित क्षेत्र मग ते फूड प्रोसेसिंग असो, कोल्ड चेन असो, यांच्यात भिंती असायच्या. आता या अडचणी दूर होत आहेत. आता शेतकऱयांना नवीन बाजार आणि नवीन पर्याय मिळतील. कृषी क्षेत्रात जास्त गुंतवणूक होईल, असा दावाही पंतप्रधानांनी केला.

भारत आता जग जिंकतंय!

भारतातील स्थितीची दखल संपूर्ण जगाने घेतलेली आहे. भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जी कामे केली, धोरणे राबविली, निर्णय घेतले ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकीत होत आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले. मागील सहा वर्षात सरकारने केलेल्या सुधारणांमुळे देशवासीय पुढे-पुढे जात आहेत. जगाचा जो विश्वास भारताने मागील सहा वर्षात जिंकला आहे, तो मागील काही महिन्यात आणखी मजबूत झाला आहे. विदेशी गुंतवणुकीचा विक्रम भारताने केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

2020 : परिस्थिती बिघडली, पण सुधारलीही!

आपण 20-20 सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिले आहे. 2020 वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोनाकाळाबाबत विचार करू त्यावेळी आपल्यालाही विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत. मात्र चांगली गोष्ट ही आहे की, जेवढय़ा वेगाने परिस्थिती बिघडली. तेवढय़ाच वेगाने स्थिती सुधारतदेखील असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

महाबाहु-ब्रम्हपुत्रा योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Amit Kulkarni

कोरोना युद्धात बेसावधपणा नकोच !

Patil_p

नौशेरा सेक्टरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

prashant_c

जंगलातील दलदलींच्या रस्त्यांवर मुख्यमंत्री स्वतः चालविली गाडी

Patil_p

महाराष्ट्र, केरळमधील वाढता संसर्ग चिंताजनक

Patil_p

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar