Tarun Bharat

कारागृहातील सावरकरांची प्रतिमा हटविण्यात आल्याने संताप

हिंदुत्ववादी संघटनांनी विचारला जाब : लावण्यात आली नवी प्रतिमा

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची प्रतिमा काढण्यात आल्याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला. कारागृह प्रशासनाला जाब विचारताच आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे कारण देण्यात आले. जोवर सावरकरांची प्रतिमा होती त्या ठिकाणी लावत नाही तोवर हटणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यावर त्या ठिकाणी दुसरी प्रतिमा लावण्याची कारागृह प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर 4 एप्रिल ते 13 जुलै 1950 मध्ये हिंडलगा येथील कारागृहात होते. या घटनेची आठवण म्हणून स्वा. सावरकरांची प्रतिमा कारागृहात लावण्यात आली होती. सावरकरांच्या जयंती व पुण्यतिथीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथे जाऊन वंदन करीत होते. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोणालाही कारागृहात जाऊन वंदन करता आले नाही. या काळात सावरकरांची प्रतिमा हटविण्यात आली.

शनिवारी वि. दा. सावरकरांची पुण्यतिथी असल्यामुळे हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख रवी कोकितकर वंदन करण्यासाठी कारागृहात गेले असता प्रतिमा हटविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कारागृह परिसरात बोलावून घेतले. सर्वांनी कारागृह प्रशासनाला जाब विचारताच जुन्या कारागृह अधिकाऱयांनी प्रतिमा हटविली असण्याची शक्मयता अधिकाऱयांनी वर्तविली. यावर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोवर प्रतिमा लावत नाही, तोवर कारागृहाच्या समोर बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कारागृह प्रशासनाने प्रतिमा पुन्हा लावण्याला परवानगी दिली.

हिंदू संघटनांनीच लावली प्रतिमा

अखेर हिंदू राष्ट्र सेना व काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्वतःच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आणली. त्या प्रतिमेचे कारागृहाबाहेर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ती प्रतिमा पूर्वी होती त्या ठिकाणी बसविण्यात आली. ज्या कारागृहात सावरकरांनी 3 महिने काढले त्या बेळगावच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी हिंदुत्ववादी मारुती सुतार, नागेश पाटील, अभिलाष देसाई, विनय आग्रोळी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  

Related Stories

पहिल्या रेल्वेगेट येथे दुरुस्तीचे काम

Omkar B

कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

Patil_p

पावसाची विश्रांती, शेतकऱयांना दिलासा

Patil_p

निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱयांच्या सूचना

Omkar B

नामदेव शिंपी समाजासाठी निगम मंडळाची स्थापना करा

Amit Kulkarni

हिंडलगा भागात तीन तास वीज गुल

Amit Kulkarni