Tarun Bharat

कारागृह नव्हे, सुधारगृह…!

Advertisements

जिल्हा कारागृहात भाजी लागवड, शेतीचा यशस्वी प्रयोग : 18 कैद्यांनी श्रमदानातून फुलविला मळा : चांगल्या कामाच्या निमित्तानं केली ‘जेलवारी’

महेंद्र पराडकर / ओरोस:

चौडी-चौडी सडक नही,

उँचे उँचे घर नही,

लफडा झगडा डर नही,

शोर-शराबा यहाँ नही,

खून-खराबा यहाँ नही,

कहनेवाले जेल कहें,

पर यहाँ बडी खुशियाली,

दे ताली दे दे दे दे ताली

 सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘आर्मी’ चित्रपटातील एका गाण्यात करण्यात आलेले तुरुंगाचे हे वर्णन त्या चित्रपटातील कथानकानुरुप आहे. मात्र, वास्तवात तुरुंगातील जीवन असे असते का हे प्रत्यक्ष तुरुंगात गेल्याशिवाय कळणार नाही. पण तशी वेळ आपल्यावर येऊ नये, याची खबरदारी प्रत्येक जण घेत असतो. कारण तुरुंग म्हणजे चुकीचं वागणाऱया पापी लोकांसाठीची जागा, असे लहानपणीच आपल्या मनावर खोलवर बिंबवलं जातं. परंतु या तुरुंगातील कैद्यांचेही माणूस म्हणून जीवन असते. केवळ ‘एक गुन्हेगार’ म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही फार उपयोगाचा नाही. त्यांनाही सृजनशीलतेचा आनंद मिळायला हवा. त्यांचे मन:स्वाथ्यही चांगले राहायला हवे, या दृष्टीकोनातून धडपड करणारे जेलर आणि सेवाभावी संस्थांसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह वर्ग-01 मध्ये असाच एक ‘फलदायी’ प्रयोग यशस्वी झालाय.

 ‘शोले’ आणि ‘गुप्त’सारख्या अनेक चित्रपटांतून समाजमनामध्ये जेलरविषयीची खडूस प्रतिमा तयार झाली आहे. प्रत्यक्षात असे काही असते का हे जाणून घ्यायच्या फंदात आपण कधी पडत नाही किंवा तसा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण तुरुंग हे असे ठिकाण आहे, की ज्यातील हवा खायला कुणाल<ाच आवडत नाही. परंतु गुरुवारी, 21 जानेवारी रोजी भगिरथ प्रतिष्ठान, झाराप आणि कुडाळ रोटरी क्लब सदस्यांनी चांगल्या कारणास्तव ‘जेलवारी’ केली.

 निमित्तं होतं, ओरोस येथील जिल्हा कारागृहातील 18 कैद्यांनी पडिक जमिनीत आपल्या श्रमदानातून फुलविलेल्या शेतमळय़ाच्या पाहणीचे. सायंकाळी 4.30 वाजता भगिरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांच्यासमवेत कुडाळ रोटरीची टीम कारागृहात दाखल झाली. तुरुंगाधिकारी सी. आर. देवकाते यांनी सर्वांना आत घेतले. तेथील पोलिसांनी प्रथम सर्वांना आपले मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याची सूचना केली. त्यानुसार सर्वांनी मोबाईल जमा केले. त्यानंतर कैद्यांनी फुलविलेल्या फळभाजीपाला बागेत फेरफटका सुरू झाला. यावेळी काही कैदी मळय़ात वावरत होते. कुणी पाणी देत होता. कुणी तयार झालेले भोपळे काढत होता. आपण चार भिंतीच्या आड मर्यादित विश्वात राहून फुलविलेल्या मळय़ाचा कानोसा घ्यायला ही तुरुंगाबाहेरच्या व<ातावरणातील कोण माणसं आलीत, असा चेहरा करून पाहणाऱया कैद्यांचे चेहरे खूपच बोलके होते.

भगिरथ प्रतिष्ठानने घेतला पुढाकार

 कैद्यांनी तयार केलेल<ा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्याच्या यशस्वी प्रयोगाची पाहणी करून झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. देवधर म्हणाले, एकदा एका कार्यक्रमात तुरुंगाधिकारी देवकाते यांची भेट झाली. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये ओरोस सुधारगृहामध्ये जाण्याचा योग आला होता. तुरुंग हा सर्वांना समजणारा शब्द आहे. विवेकाचे भान हरवले, की प्रमाद घडतो. कोर्टकचेरी, वकील, न्यायालय या साऱया प्रक्रियेतून शिक्षा होते. कच्चे कैदी, पक्के कैदी हे न समजणारे शब्द ठरतात. म्हटलं तर समाजात या विषयाची चर्चा होत नाही. तो चर्चेचा कप्पाच आपण बंद करून टाकतो. पण त्यादिवशी ओरोस येथे जे पाहिले, ते विलक्षण होते. सुधारगृहामधील कैद्यांना सोबत घेऊन तुरुंग अधिकारी देवकाते, हवालदार अनिरुद्ध हडकर यांच्या सहकाऱयांनी केलेली भातशेती, शेवगा, केळीची लागवड खूप काही वेगळे सांगत होती. कैद्यांनी कुदळ, खोऱयाने भातशेती केली होती. असे काही घडताना पाहिलं की वाटतं, भगिरथने मदत केली पाहिजे. रोटरी क्लब, भगिरथ प्रतिष्ठानने एकत्रितपणे मदत करण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली अन् आज त्याचे अधिक दृश्य परिणाम दिसत आहेत.

प्रयोगाचा विस्तार होऊ शकतो

 देवकाते यांच्यासमवेत प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर भगिरथचे नारायण चेंदवणकर आणि अवधूत देवधर यांनी आठवडय़ातून एक भेट सुधारगृहामध्ये सुरू केली. प्रभाकर सावंत यांच्याकडे याचे पालकत्व सोपविण्यात आले. एक दिवस जेसीबीद्वारे जमिनीचे सपाटीकरण झाले. भीम भोपळा लावणी करण्यात आली. आज 240 भोपळे, वांगी 400, मिरची 150, पपई 90, चाफा 10, मका (स्विटकॉर्न) 3 गुंठे, भेंडी यांची यशस्वी लागवड येथे झालीय. यग्नासाठी एकूण 70,034 रुपये  खर्च या आतापर्यंतच्या कामासाठी आला. जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी खतांची गरज होती. यासाठी 50 पोती कोंबडी विष्ठा खत पुरविण्यात आले. तुरुंगाची एकूण 17 एकर जमीन आहे. त्यामुळे प्रयोगाचा विस्तार होऊ शकतो, असे मत डॉ. देवधर यांनी व्यक्त केले.

 भविष्यातील उपक्रमांसाठीची पॉवर ट्रीलर तसेच अन्य बाबींची यादी सादर करण्याचे आवाहन त्यांनी सुधारगृह व्यवस्थापनाला केले. कारागृह अधीक्षक एच. एस. जाधवर, कारागृह अधीक्षक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी राजेंद्र तारापुरे, रोटरीचे सचिन मदने, शशिकांत चव्हाण, एकनाथ पिंगुळकर, राजीव पवार, गजानन कांदळगावकर, भगिरथ प्रतिष्ठानचे नारायण चेंदवणकर, प्रभाकर सावंत, अवधूत देवधर, अमेय तेंडोलकर आदी उपस्थित होते. कारागृह अधीक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

चांगला नागरिक बनून बाहेर पडेल!

 तुरुंगाधिकारी देवकाते म्हणाले, जेलमध्ये फक्त निगेटिव्ह पॉवर असते, असे मानले जाते. समाजातून टाकलेली व्यक्ती तुरुंगात असते, असाही एक समज आहे. परंतु सुधारणा आणि पुनर्वसन गृहात राबविलेल्या अशा उपक्रमांमधून बंदीवानांना एक चांगला नागरिक बनण्याचा विचार मिळू शकतो. आपण पुन्हा जेलमध्ये येणार नाही. पुन्हा गुन्हा करणार नाही, याचे बीजही यातून रोवले जाऊ शकते. श्रमदानातून आत्मसात केलेल्या कौशल्याचा वापर भविष्यात तो बाहेरच्या जीवनात करू शकतो. अशा उपक्रमांमुळे कैद्यांचे मन कामात गुंतून राहते. आम्ही अनुभवलेय की, भगिरथ प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मार्गदर्शनासाठी कधी येणार, याची उत्सूकता त्यांना असायची, असे देवकाते यांनी सांगितले.

देवधर यांनी खरेदी केला भोपळा

 अमुक मातीत वांगे होणार नाही हे या कैद्यांनीच सूचविले होते आणि तसे झालेही एवढे ते शेतीच्या कामात गुंतल्याचा सुखद अनुभव नारायण चेंदवणकर यांनी सांगितला. जाता-जाता डॉ. देवधर यांनी कैद्यांनी पिकविलेला भोपळा कारागृह अधीक्षकांकडून भेट स्वरुपात न घेता, त्याची रितसर पावती करून तो विकत घेत वेगळा आदर्श समोर ठेवला. हा भ्रमाचा नाही, तर श्रमाचा भोपळा आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

वारणा बंधारा दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

Abhijeet Shinde

ऍन्टीकरप्शन अधिकारी असल्याचे भासवून लुटण्याचा प्रयत्न

Patil_p

ड्रिंक्सहून अधिक इंटीरियरची चर्चा

Patil_p

मासेमारी बंद, आंदोलन सुरू

NIKHIL_N

रांची विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

Patil_p

तलाव ठेक्यामुळे मत्स्य विभागाला 7 लाखांचे परवाना शुल्क

Patil_p
error: Content is protected !!