Tarun Bharat

कारापूर कुडणे मतदारसंघातील मगोच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.

  डिचोली/प्रतिनिधी

  सध्या राज्यातील भाजप सरकार हे खिचडी सरकार असून या सरकारचा कारभार हवेत चालला आहे. राज्यातील सरकारला आणि राजकीय स्थातीला जनता कंटाळली आहे. सामान्य जनतेप्रती सरकार गंभीर नसून केवळ राजकीय डावपेच आखण्यातच सरकार वेळ वाया घालवत आहे. याचा पूर्णपणे धडा या सरकारला जनता शिकवणार आहे. कारापूर कुडणे या मतदारसंघात मगोच्या जिल्हा पंचायत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठा पाठिंबा लाभत आहे, असे यावेळी मगो पक्षाचे राज्य अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले.

    कारापूर कुडणे जिल्हा पंचायत निवडणुकीतील मगो पक्षाचे  उमेदवार योगेश पेडणेकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी दिपक ढवळीकर बोलत होते. विठ्ठलापूर कारापूर येथील वाघेरी इमारतीत मगो पक्षाने उघडलेल्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटनाला कारापूर सर्वण पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य संतोष गुरव, दामोदर गुरव, मगोचे कार्याध्यक्ष एड. नारायण सावंत, युवानेते रोहन सावईकर, हेमंत पिळगावकर, माजी नगरसेवक रियाझ खान, जमीर मागोडकर, संजय नार्वेकर, रमेश सिनारी, सिध्देश तारी, विश्वेश गाडगीळ, वैभव गाडगीळ व इतरांची उपस्थिती होती.

    संपूर्ण राज्याप्रमाणेच कारापूर कुडणे या मतदारसंघातही भाजपविरोधी वातावरण असून या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मगोचे कार्य संपूर्ण राज्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे या मतदारसंघात जनता मगोचा मागे खंबीरपणे उभी राहणार यात शंकाच नाही, असेही यावेळी अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले.

     यावेळी उमेदवार योगेश पेडणेकर यांनी म्हटले की, समासेवा करण्याची आवड असल्याने आपण समाजकारणातून राजकारणात उतरलो आणि 2017 ची पंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीत आपल्याला 450 च्या वर मते मिळाली. त्यामुळे डिचोली तालुक्मयात सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार आपण ठरलो. त्यानंतर पंचसदस्य पदाला न्याय देताना आपण या पंचायत क्षेत्रात केलेले काम लोकांसमोर आहे. त्याचा या निवडणुकीत आपल्याला लाभ निश्चितच होणार.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड अपक्षांचा पाठिंबा ?

    कारापूर कुडणे या मतदारसंघातील मगोचे उमेदवार योगेश पेडणेकर यांना या मतदारसंघात अपक्षपणे उमेदवारी दाखल केलेल्या संजय नार्वेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत मगो पक्षाला या मतदारसंघातून पाठिंबा जाहिर केला होता. तसेच या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उतरविला नसून आपल्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे मयेतील नेते संतोषकुमार सावंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांचाही पाठिंबा आपल्याला मिळणार असल्याचे यावेळी उमेदवार योगेश पेडणेकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उमेदवार नसलेल्या मतदारसंघांमध्ये कोणाला पाठिंबा देण्याबाबत 15 रोजी निर्णय.

   मगो पक्षाने राज्यातील एकूण 18 मतदारसंचांमध्ये उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र त्यातील हरमल या मतदारसंघातील एक अर्ज मागे घेतला आहे. या राज्यातील भाजप सरकारविरोधात असलेल्या समविचारी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ज्या मतदारसंघातील भाजपचा उमेदवाराचा पडाव करणे शक्मय आहे, तेथे भाजपविरोधी उमेदवाराला येत्या 15 – 16 तारखेला होणाऱया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. लाटंबार्से या मतदारसंघात मगोला योग्य ओबीसी उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे या मतदारसंघात मगोने उमेदवार उतरविला नाही. या मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत या मतदारसंघातील मगोचे नेते नरेश सावळ यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे. असेही यावेळी दिपक ढवळीकर यांंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  फित कापून व समई प्रज्वलित करून मगोच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. स्वागत हेमंत पिळगावकर यांनी केले तर आभार संतोष गुरव यांनी मानले.

Related Stories

उपराष्ट्रपती 27 रोजी गोवा भेटीवर

Patil_p

नुवे येथे कार व स्कूटर अपघात

Amit Kulkarni

मडगावात दिगंबर कामतच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण ?

Amit Kulkarni

बेकायदा जलसफरी करणाऱयावर कारवाई सुरुच रहाणार

Omkar B

स्तनपान करणाऱयांना लसीकरणात प्राधान्य

Patil_p

काँग्रेस महिलां शिष्टमंडळ व पोलिस यांच्यामध्ये प्रंचड प्रमाणात धक्काबुक्की

Patil_p