Tarun Bharat

कार्लसनला धक्का देत वेस्ली सो विजेता

ऑपेरा युरो रॅपिड बुद्धिबळ – रॅडेबोव्हला तिसरे स्थान

वृत्तसंस्था/ चेन्नई

अमेरिकेचा स्टार बुद्धिबळपटू वेस्ली सो याने नॉर्वेचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का देत ऑपेरा युरो रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वेस्ली हा आता मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरची दोन अजिंक्यपदे मिळविणारा पहिला बुद्धिबळपटूही बनला आहे. वर्षभर चालणाऱया या मालिकेत तो आता किंचित फरकाने आघाडीवर आहे. तैमूर रॅडेबोव्हने तिसरे स्थान मिळविले.

27 वर्षीय वेस्लीने याआधीच्या व आताच्या स्पर्धेत कार्लसनचा दोन्ही अंतिम लढतीत पराभव केला. ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळमध्ये तो आता सरस होत असल्याचेच दिसून येत आहे. कार्लसनची या प्रकारावरील मक्तेदारी त्याने आता संपुष्टात आणली असून या प्रकारात तो जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू असल्याचा दावा करू शकतो. शनिवारी पहिल्या टप्प्यात त्याने कार्लसनशी 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर रविवारी दुसऱया टप्प्यातील पहिल्याच डावात वेस्लीने हल्ला चढविला. कार्लसनने धोकादायक पद्धतीने आक्रमण केले होते. पण ते चुकीचे ठरल्यानंतर 28 चालीत वेस्लीने विजय मिळविला. त्यानंतरचे दोन डाव अनिर्णीत राहिल्यानंतर अंतिम तिसरा डाव मात्र रोमांचक ठरला. यात कोणीही जिंकू शकेल, अशी स्थिती होती. पण अखेरीस हा डावही बरोबरीत सुटल्यामुळे एकंदर गुणांकात वेस्लीने विजेतेपद पटकावले. कार्लसनने अनेक पद्धतीने त्याच्यावर आक्रमण केले, पण वेस्लीने भक्कम बचाव करीत त्याला संधी मिळू दिली नाही. आतला आवाज न ऐकल्याबद्दल कार्लसनने नंतर स्वतःलाच दोष दिला. पण वेस्लीने आपल्याला सतत दडपणाखाली ठेवले होते, हे मान्य करीत त्याने त्याचे कौतुकही केले.

मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर मालिकेतील स्किलिंग ओपन या पहिल्या स्पर्धेतही वेस्लीने कार्लसनवर विजय मिळविला होता. ऑपेरा युरो रॅपिड चॅम्पियन स्पर्धेत शनिवारी 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर रविवारी अंतिम टप्प्यात वेस्लीने पहिला डाव जिंकून नंतरचे तीन डाव बरोबरीत ठेवत जेतेपद निश्चित केले. तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तैमूर रॅडेबोव्हने मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हचा दोन डावात पराभव केला.

Related Stories

लखनौ सुपर जायंट्सचा चौथा विजय

Patil_p

फलंदाजांसाठी हेल्मेट सक्तीची गरज : सचिन

Patil_p

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतून हॉलंडची माघार

Patil_p

हेन्डरसन यांचा चेअरमनपदाचा त्याग

Patil_p

अफगाण क्रिकेटपटूंच्या सरावाला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!