Tarun Bharat

किवीज यष्टीरक्षक-फलंदाज वॅटलिंगची निवृत्तीची घोषणा

भारताविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये शेवटचे प्रतिनिधीत्व करणार

वेलिंग्टन / वृत्तसंस्था

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज बीजे वॅटलिंगने पुढील महिन्यात आपण निवृत्त होत असल्याची घोषणा बुधवारी केली. न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध दि. 18 जूनपासून विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत खेळणार आहे. या सामन्यानंतर आपण निवृत्त होऊ, असे वॅटलिंग म्हणाला. उभय संघातील ही महत्त्वाची लढत साऊदम्प्टन येथे होईल. या लढतीपूर्वी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध आणखी 2 कसोटी सामने खेळणार आहे.

जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या 35 वर्षीय वॅटलिंगने 2009 मध्ये सलामीवीर या नात्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. त्यानंतर तो किवीज कसोटी संघातील मुख्य खेळाडू म्हणून नावारुपास आला. आतापर्यंत त्याने 73 कसोटी सामने खेळले आहेत.

यष्टीमागे 249 झेल घेण्याचा विक्रम

‘निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट हेच सर्वोच्च क्रिकेट आहे आणि पाच दिवस संघासमवेत संघर्षमय खेळ साकारण्याचा आनंद लुटता आला, याचा मला सार्थ अभिमान आहे’, असे वॅटलिंगने निवृत्तीची घोषणा करताना नमूद केले. वॅटलिंगच्या खात्यावर यष्टीमागे 249 झेल घेण्याचा विक्रम आहे. शिवाय, 8 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. विद्यमान यष्टीरक्षकात त्याची ही कामगिरी अव्वल आहे. याशिवाय, क्षेत्ररक्षक म्हणून त्याने 10 झेल घेतले आहेत.

न्यूझीलंडची मध्यवर्ती करारश्रेणी शुक्रवारी जाहीर केली जाणार असून त्यात स्थान मिळणे कठीण असल्याने वॅटलिंगने निवृत्तीची घोषणा करणे अपेक्षित मानले जात होते. ‘इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे. या दौऱयात यश खेचून आणायचे असेल तर आम्हाला सर्व आघाडय़ांवर अव्वल खेळ साकारावा लागेल’, असे वॅटलिंग येथे म्हणाला. वॅटलिंगचे ‘बॉलर-किपर कॅचिंग कॉम्बिनेशन’ जलद गोलंदाज टीम साऊदी (73), ट्रेंट बोल्ट (55), नील वॅग्नर (53) यांच्याशी चांगलेच फलद्रुप ठरले.

फलंदाजीतही उत्तम योगदान

याशिवाय, वॅटलिंगचे फलंदाजीतील योगदानही लक्षवेधी ठरले. वॅटलिंगच्या खात्यावर 8 कसोटी शतके नोंद असून न्यूझीलंडतर्फे चौथ्या व पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी साकारणाऱया फलंदाजांच्या यादीत तो समाविष्ट आहे. त्याने 2014 मध्ये बेसिन रिझर्व्ह मैदानावर ब्रेन्डॉन मेकॉलमसह भारताविरुद्ध 362 धावांची तर विद्यमान कर्णधार केन विल्यम्सनसह श्रीलंकेविरुद्ध याच मैदानावर नाबाद 365 धावांची भागीदारी साकारली. एकंदरीत त्याच्या खात्यावर कसोटी क्रिकेटमध्ये 73 सामन्यात 3773 धावा नोंद आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो केवळ नववा यष्टीरक्षक आहे तर इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम करणारा तो पहिलाच यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. बे ओव्हलवर नोव्हेंबर 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाटय़मय विजय संपादन करुन दिल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. मिशेल सॅन्टनरसह सातव्या गडय़ासाठी 261 धावांची भागीदारी साकारण्याचा विक्रमही त्याच्या खात्यावर नोंद आहे.

नव्या विक्रमाची संधी

आगामी दौऱयात वॅटलिंगने तीनही कसोटी सामने खेळले तर तो न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक 67 कसोटी सामने खेळण्याचा यष्टीरक्षक ऍडम पॅरोरेचा विक्रम मोडीत काढू शकेल. आगामी दौऱयात न्यूझीलंडचा संघ दि. 2 ते 6 व दि. 10 ते 14 जून या कालावधीत इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने व नंतर दि. 18 जूनपासून भारताविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल लढतीत खेळणार आहे.

Related Stories

अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धा; एवायएम अनगोळ बी, एमपी बॉईज संघ विजयी

Sandeep Gawade

केरळच्या संभाव्य संघात श्रीशांतचा समावेश

Patil_p

स्पेनच्या मुगुरुझाचे आव्हान समाप्त

Patil_p

आयसीसीच्या वनडे मानांकनात कोहली, रोहित शर्मा आघाडीवर

Patil_p

बेल्जियमचा स्पेनवर विजय

Patil_p

सिंधुचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p