Tarun Bharat

कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात कोरोनासंदर्भात जागृती

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी :

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कोरोना विषाणूसंदर्भात राबविण्यात आलेल्या जनजागृतीच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी पोलिसांबद्दल नागरिकांनी कौतुकोद्गार काढले.

कुंकळळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सदर उपक्रम पाच ठिकाणी राबण्यात आला. चिंचोणे येथील कार्यक्रमाच्या दरम्यान अधीक्षक गावस व इतरांना स्थानिक नागरिकांनी भेटवस्तू देऊन कौतुक केले. या सर्व कार्यक्रमांत कोरोनाविषयी घ्यायच्या खबरदारीच्या उपायांसंबंधी माहिती देण्याबरोबर जागृती करणारी जी गाणी सादर करण्यात आली त्यांनाही नागरिकांनी टाळय़ा वाजवून प्रतिसाद दिला. या उपक्रमात सहभाग राहिलेले उपअधीक्षक सॅमी तावारीस व वास्कोतील पोलीस कॉन्स्टेबल भक्ती देविदास यांचा कुंकळळीतील कार्यक्रमाच्या दरम्यान प्रभारी नगराध्यक्ष विदेश देसाई यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. गुन्हा अन्वेषण विभागाचे कॉन्स्टेबल राजेश देसाई व जुलन देसाई यांच्या हस्ते अनुक्रमे या भेटवस्तू देण्यात आल्या.

यापुढेही संयम दाखवा : डायस

कुंकळळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चिंचोणे, आंबेली, बेतूल व बाळळी येथे तसेच कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात हे कार्यक्रम झाले. कुंकळळीचे आमदार क्लेफासियो डायस यांनी त्यास खास उपस्थित राहून अधीक्षक गावस यांनी हाती घेतलेल्या ऊपक्रमाची स्तुती केली. पोलिसांना सहकार्य करा, नियमांचे काटेकोरपणे पालन करा. सरकारचे आदेश पाळा. तरच कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होईल. आतापर्यंत जसा संयम राखला तसाच यापुढे दाखवा, असे आवाहन आमदार डायस यांनी लोकांना केले. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर निश्चित या जागृती करणाऱया पोलिसांचा कुंकळळीत गौरव करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रभारी नगराध्यक्ष देसाई यांनी पोलीस राबवत असलेल्या जागृती उपक्रमाचे स्वागत केले. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे त्यांनी आवाहन केले. समाजमाध्यमांतून केल्या जाणाऱया अपप्रचाराबद्दल त्यांनी चीड व्यक्त केली. राजकारण, मतभेद बाजूला ठेवून आपण सर्व जण मिळून कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकूया. सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन देसाई यांनी नागरिकांना केले. अधीक्षक गावस, उपअधीक्षक सेराफिन डायस व तावारीस हे पोलीस खात्याला लाभलेले हिरा असल्याचे सांगताना त्यांनी कॉन्स्टेबल देविदास व उपनिरीक्षक डायगो ग्रासियश यांचीही स्तुती केली.                                  

Related Stories

निवडणुकीत मतदारांचा सहभाग

Amit Kulkarni

कोरोनाचे 12 बळी, 1420 नवे बाधित

Amit Kulkarni

‘श्री गवळादेवी’चा आज पासून जत्रोत्सव

Amit Kulkarni

‘आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण गोवा’अभियान प्रेरणादायी

Amit Kulkarni

सरकारी कर्मचाऱयांना मास्क पुरवणार

tarunbharat

बाप्सोरा, वेळ्ळी राममंदिरात उद्यापासून मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा

Patil_p