Tarun Bharat

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसरांत विजेचा लपंडाव

वीजवाहिन्यांवर पसरलेल्या फांद्या, धोकादायक झाडे कापण्याकडे लक्ष देण्याची मागणी

प्रतिनिधी / कुंकळ्ळी

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा, असोळणा, बेतूल या भागांमध्ये वरचेवर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार चालू असून त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. या साऱया भागांना शिंप्लेर-वेरोडा, कुंकळ्ळी येथील वीज केंद्रावरून पुरवठा होत असतो

तौक्ते चक्रीवादळ आल्यावेळी फातर्पा तसेच बाळ्ळी परिसर जवळजवळ पाच दिवस, तर कुंकळ्ळी परिसर तीन दिवस अंधारात राहिला होता. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात झाडांची पडझड झाली होती. मात्र सध्या कशामुळे विजेचा लपंडाव चालू आहे, असा प्रश्न लोकांकडून केला जात आहे. पावसाळय़ापूर्वी विविध तांत्रिक दुरुस्ती तसेच देखभालीच्या कामासाठी व वीजवाहिन्यांवर येणाऱया झाडांच्या फांद्या कापण्यासाठी म्हणून वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडित केला जात असतो. असे असतानाही विजेच्या लपंडावाचे प्रकार कसे काय घडतात, असा सवाल लोकांकडून केला जात आहे. वीजवाहिन्यावर येणाऱया झाडांच्या फांद्यांची नीट छाटणी न करण्याचा प्रकार यास कारणीभूत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

बाळ्ळी परिसरात काजुवाडा येथे रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्या सरळ वीजवाहिन्यांवर आलेल्या आहेत, तर कटा-बाळ्ळी येथे एका खांबावरून गेलेल्या वीजवाहिन्यांच्या मध्ये एक माड असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत वारा आल्यानंतर झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांना घासल्या जातात आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात, असे लोकांचे म्हणणे आहे

पंच, नगरसेवकांची मदत घ्यावी

हल्लीच कुंकळ्ळीत एका ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यासाठी आल्यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे काही लोकांनी वीजवाहिन्यांवर आलेली झाडे नीट कापली जात नसल्याने समस्या उद्भवतात याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी काब्राल यांनी त्यांना संबंधित नगरसेवक वा पंचांना घेऊन अशा झाडांची छाटणी करून घेण्याची तसेच गरज पडल्यास पोलिसांची मदत घेण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने वीजवाहिन्यांवर येणाऱया व धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करण्याच्या दृष्टीने संबंधित पंच व नगरसेवकांना विश्वासात घेऊन उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पंच व नगरसेवकांना आपापल्या परिसराची चांगली कल्पना असते. त्यामुळे ते याबाबतीत योग्य त्या सूचना करू शकतील, असे मत लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे

त्याचबरोबर झाडे कापण्यासाठी कटरही आवश्यक त्या प्रमाणात वीज खात्याकडे नसतात असे दिसून येते. गरजेप्रसंगी त्यामुळे अग्निशामक दल आणि इतर यंत्रणांकडून कटर मागून घेण्याऐवजी पुरेशा प्रमाणात या उपकरणांची सोय खात्याने करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, फातर्पा-बाळ्ळी परिसरांतील वीजपुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने पाटे-बाळ्ळी येथे वीज उपकेंद्र उभारण्यासाठी तयारी चालली होती आणि त्यासाठी कोमुनिदादीने दिलेल्या जमिनीचे भूसंपादनही करण्यात आले होते. याकामी कुंकळ्ळीचे तत्कालीन आमदार राजन नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मात्र अजूनही सदर केंद्र मार्गी लागू शकलेले नाही. हे केंद्र उभे राहिल्यास बाळ्ळी, फातर्पा येथील वीजपुरवठय़ात सुधारणा झाली असती.

कुंकळ्ळीच्या आमदारांकडून दखल

कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस हे रविवारी बाळ्ळी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता या प्रतिनिधीने त्यांचे लक्ष झाडांची छाटणी न केल्यामुळे फांद्या कशा वाढून वीजवाहिन्यांवर पोहोचलेल्या आहेत याकडे वेधले असता त्यांनी तत्काळ दखल घेऊन पाहणी केली. कटा येथे वीजवाहिन्यांच्या मधोमध असलेला माड पाहून या प्रकाराबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. वीज अधिकाऱयांच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा विषय चर्चेस घेण्याचे आश्वासन डायस यांनी यावेळी दिले.

Related Stories

मंत्री मिलिंद नाईक यांना हटवून एफआयआर नोंदवा

Patil_p

आग्वाद तुरुंग नूतनीकरण उद्घाटनास पंतप्रधान येणार

Amit Kulkarni

आयएसएलसाठी साधन सुविधा पुरविण्याचे काम गोमंतकीयांना द्या

Patil_p

मान्सूनोत्तर पावसाचा जोर वाढला

Amit Kulkarni

सुर्ला ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांमुळे प्रगतीच्या दिशेने

Amit Kulkarni

राज्यातील 144 कलम मागे

Amit Kulkarni