Tarun Bharat

कुडचडेवासियांचा स्वाभिमान जागा झाल्याचे निकालातून स्पष्ट

Advertisements

‘स्वाभिमान पॅनल’च्या पत्रकार परिषदेत पुष्कल सावंत यांचे उद्गार : मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडे-काकोडा पालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत काकोडा व कुडचडेच्या समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन ‘स्वाभिमान काकोडा-कुडचडे’ या पॅनलची घोषणा करून नऊ उमेदवार उतरविलेले होते. त्यातील क्लेमेंटिना फर्नांडिस या निवडून आल्या आहेत तर इतर सर्व पराभूत उमेदवारांनी तोडीस तोड मते घेतलेली आहेत. स्वाभिमान गट लोकांसमोर आल्यानंतर बऱयाच गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत. काही लोकांना कुडचडेत चाललेल्या हुकूमशाहीबद्दल रोष आहे व ती कायमची कुडचडेतून बाहेर काढायची आहे असा सूर ऐकू आला. स्वाभिमानच्या पराभूत उमेदवारांना थोडीशीच मते कमी पडली आहेत. त्यावरून दिसून येते की, खूप कमी वेळेत लोकांमधील स्वाभिमान जागा झाला, असे उद्गार पुष्कल सावंत यांनी काढले.

काकोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विजेत्या उमेदवार क्लेमेंटिना फर्नांडिस, विकास भगत, जेम्स फर्नांडिस, अली शेख व विराज नागेकर आदी उपस्थित होते. मतदारांनी जो विश्वास दाखविलेला आहे तो स्वाभिमान सार्थ ठरविणार व ज्याप्रमाणे जाहीरनामा तयार केला होता त्याप्रमाणे लोकांची कामे करण्याचा प्रयत्न करत राहील, असे आश्वासन सावंत यांनी दिले.

क्लेमेंटिना फर्नांडिस यांच्यापुढे सरकारात मंत्री असलेल्या स्थानिक आमदारांनी ठेवलेल्या उमेदवाराला हार स्वीकारावी लागली. निवडणुकीचे आकडे बघितले, तर स्वाभिमानचे अन्य पाच उमेदवार दुसऱया क्रमांकावर व अन्य तीन तिसऱया क्रमांकावर राहिलेले आहेत. जे उमेदवार हरले आहेत त्यातील एक 6 मतांनी, एक 17 मतांनी, एक 25 मतांनी, एक 28 मतांनी, तर एक उमेदवार 52 मतांनी हरलेला आहे. कदाचित ही हार स्वाभिमानला वेळ कमी मिळाल्यामुळे झाली असेल. पण मतदारांनी एवढय़ा कमी वेळेत जो विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे भगत म्हणाले.

ही भाजपाची हारच

जे उमेदवार भाजपने ठेवले होते त्यांना एकूण 13956 मधील फक्त 2910 मते प्राप्त झालेली आहेत. त्यावरून समजते की, 10346 मते त्यांच्या विरोधात पडलेली आहेत. ही त्यांची हार आहे. याउलट स्वाभिमान पॅनलच्या नऊ उमेदवारांना एकूण 2627 मते मिळाली. कमी वेळेत अंदाजे 20 टक्के मते या पॅनलने घेतलेली आहेत. राजकीय नजरेतून बघितले तर हा आमचा विजय व स्थानिक आमदार असलेल्या मंत्र्यांची हार आहे. कुडचडे पालिकेत आपले 14 उमेदवार निवडून येणारच असे विधान या मंत्र्यांनी केल्याचे ऐकू येत होते. पण ते विधान खोटे ठरलेले आहे, असे भगत म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे जाहीरपणे कुडचडेत भाजप विजयी झाल्याचे सांगत आहेत. पण कुडचडेत जे उमेदवार निवडून आले आहेत त्यात भाजपाचे फक्त सहा उमेदवार आहेत. स्थानिक आमदारांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता तानावडे यांनी कुडचडेत येऊन एक दिवस थांबावे, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारावे, मंत्री काब्राल यांची कुडचडे मतदारसंघात काय स्थिती आहे ती जाणून घ्यावी व नंतरच व्यवस्थित माहिती लोकांसमोर ठेवावी, असे भगत पुढे म्हणाले.

एकजुटीचा विजय स्वाभिमानचा विजय हा एकजुटीचा विजय आहे. मतदारांनी दाखवून दिले आहे की, कुडचडेतील जनतेत स्वाभिमान जिवंत आहे आणि यापुढेही ते दिसून येईल यात कोणतीच शंका नाही. आमच्या विजयात एका पैशाची हेराफेरी नाही, असे जेम्स फर्नांडिस यांनी सांगितले. आपला विजय हा मतदारांचा विजय असून आपण त्यांची आभारी आहे. ज्याप्रमाणे आपण आश्वासन दिलेले आहे त्याप्रमाणे लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार व लोकांनी टाकलेला विश्वास कायम ठेवण्यावर भर देणार, असे क्लेमेंटिना फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सांगे पालिकेच्या प्रभाग 1 मधून रूमाल्डो फर्नांडिस यांचा अर्ज

Amit Kulkarni

भाऊसाहेबांच्या मडकईत शाळा बंद पडू लागल्या….

Amit Kulkarni

गोमेकॉ सुपरस्पेशालिटीमध्ये शंभर खाटांचे उद्घाटन

Omkar B

गोवा डेअरीची रू.1 कोटी 35 लाखाची वसूली पंधरा दिवसात करा

Amit Kulkarni

ताळगांव अनेक ठिकाणी विज गायब

Omkar B

पावसाळय़ापूर्वी बंधारे दुरुस्तीला प्राधान्य- कार्लुस फरेरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!