Tarun Bharat

कुडचडे मतदारसंघात भाजप, काँग्रेसमध्येच प्रमुख लढत

Advertisements

प्रतिनिधी/ कुडचडे

कुडचडे मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी मोठय़ा उत्साहात आपला हक्क बजावलेला असून नेहमीप्रमाणे सरासरी 80 टक्के मतदान झाले आहे. यात जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे ‘सायलंट’ मतदारांकडून झाल्याने निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याबाबत बरेच उमेदवार संभ्रमात दिसू लागले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांत वेगळीच चिंता दिसून येऊ लागली आहे.

कुडचडेतून एकूण सहा उमेदवार रिंगणात उतरले. त्यात आरजीचे आदित्य देसाई, काँग्रेसचे अमित पाटकर, मगो पक्षाचे आनंद प्रभुदेसाई, आम आदमी पक्षाचे गाब्रियल फर्नांडिस, भाजपचे नीलेश काब्राल व अपक्ष उमेदवार राजू भोयर यांचा समावेश आहे. मतदारसंघाचा कानोसा घेतल्यास यंदाची लढत ही स्थानिक आमदार व भाजपाचे उमेदवार काब्राल व काँग्रेस पक्षाचे पाटकर यांच्यातच होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मागील काही निवडणुका पाहिल्यास 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत कुडचडेत भाजप विजयी ठरला होता. त्यानंतर परत 2002 साली दुसऱया वेळेस भाजपाने कुडचडेत बाजी मारली. 1989 व 1994 मध्ये कुडचडेत राज्य केलेल्या काँग्रेसला 2007 साली श्याम सातार्डेकर यांच्या रूपाने कुडचडेवासियांनी परत एकदा संधी दिली. पण दुसऱया वेळेला काँग्रेस पक्षाला अपयश आले व 2012 तसेच 2017 साली परत एकदा भाजपने कुडचडेत आपला झेंडा फडकावला. भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार यांच्याकडून या कार्यकाळात कुडचडेत बरीच सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत. मतदार त्यांना पूर्ण पाठिंबा देणार असे भाजप समर्थकांचे मत आहे. पण ते कितपर्यंत खरे ठरते हे कळण्यासाठी 10 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

काँग्रेसतर्फे जोरदार आव्हान

कुडचडे मतदारसंघाचा कानोसा घेतला असता मजबूत विरोधकाच्या शोधात असलेल्या लोकांनी काँग्रेसचे उमेदवार आणि दीर्घकाळापासून समाजसेवेत असलेल्या पाटकर घराण्यातील अमित पाटकर यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे आढळून येते, असा दावा काँगेस समर्थकांकडून केला जात आहे. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी तीन इच्छुक असल्याचे उजेडात आले होते. पण अखेरीस काँग्रेसकडून पाटकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्या दिवसापासून बऱयाच वर्षांनी कुडचडेत काँगेसला मजबूत उमेदवार मिळाल्याची चर्चा रंगलेली आहे, याकडे हे समर्थक लक्ष वेधताना दिसतात.

कुडचडेत काँग्रेस पक्षाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून उमेदवार पाटकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन कुडचडेत केले गेले. त्यास हजारोंच्या संख्येने काँग्रेस समर्थकांनी व अन्य लोकांनी उपस्थिती लावली. यामुळे कुडचडेत काँग्रेसला मजबुती आल्याचे चित्र उभे झाले. कुडचडे मतदारसंघाचा इतिहास पाहता कुडचडेत जो पक्ष निवडून येतो त्याचेच सरकार राज्यात स्थापित होते. आताही तोच इतिहास घडविण्याचे ठरवून कुडचडेवासियांनी कौल दिलेला असून कुडचडेत काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार आणि राज्यातही काँग्रेसचे सरकार होणार, असा दावा या पक्षाच्या येथील समर्थकांकडून केला जात आहे.

काँग्रेस, भाजप यांच्यातच मुख्य लढत

याअगोदर कुडचडेत किती तरी पक्षांचे उमेदवार समोर आले. पण अखेर मुख्य लढत काँग्रेस व भाजपमध्येच झालेली आहे. त्याचप्रमाणे यंदाही लढत होण्याची चिन्हे दिसत असून त्यापैकी कोणाला कौल मिळतो ते पाहायचे आहे. तीन महिने गजबजलेले कुडचडेतील राजकीय वातावरण मतदान झाल्यानंतर एकदम शांत झाल्याचे  दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्या बाजूला कौल मिळेल याची कल्पना करणे कठीण झालेले आहे. मात्र निवडणूक निकालानंतर कुडचडेत बऱयाच गोष्टी घडण्याचे संकेत आताच मिळू लागले आहेत.

उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांना जास्त चिंता

सध्या कुडचडे मतदारसंघातील उमेदवारांना जेवढी चिंता नसेल तेवढी चिंता कार्यकर्त्यांना झाली असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीदरम्यान पाठ फिरविलेल्यांना परत एकदा जवळ करणे किती त्रासदायक आहे ते प्रत्येकाच्या आता ध्यानात येऊ लागले आहे. जसजसा मतमोजणीचा दिवस जवळ येत चालला आहे तसतशी कुडचडेवासियांच्या उत्सुकतेत वाढ होत आहे. सध्या मतदारसंघातील अनेक लोकांनी चुप्पी साधली असून तोंडसुख घेणारे काही जण सकाळी एक व संध्याकाळी वेगळे वक्तव्य करताना दिसून येत आहेत.

Related Stories

सत्तरी – काजरेघाट धबधब्यावर दोन युवक बुडाले

Amit Kulkarni

पोलीस निरीक्षक संदेश चोडणकरांना निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा

Omkar B

राज्यात शनिवार, रविवारी जोरदार पावसाचा अंदाज

Amit Kulkarni

कोलवाळ कारागृहातून ड्रग्ज, मोबाईल, रोकड जप्त

Amit Kulkarni

शेवटच्या मिनिटाला स्वयंगोल, चेन्नई पराभूत

Amit Kulkarni

ताळगांव नाल्याच्या साफसफाई दरम्यान अपरीहार्य समस्या

Omkar B
error: Content is protected !!