Tarun Bharat

कुणबी साडीला उर्जितावस्था मिळवून देणार

नाबार्डचे प्रयत्न, 50 जणांना देणार प्रशिक्षण

प्रतिनिधी/ पणजी

गोमंतकीय पेहरावाची अनोखी ओळख असलेल्या कुणबी साडीला राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देतानाच या व्यवसायालाही उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डतर्फे खास प्रयत्न करण्यात येणार असून तिचे जीआय नॉर्म अर्थात पेटंट मिळविण्यासाठीही सदर संस्था काम करणार आहे.

कुणबी समाजातील महिलांचे वैशिष्ठय़पूर्ण नेसण म्हणून ही साडी ओळखली जाते. हातमागावर विशिष्ट प्रकारे केलेली विणकारी आणि रंगांमुळे ही साडी आकर्षक दिसते. त्यातून अनेक पॅशन डिझायनर्सना सुद्धा भुरळ पडून पॅशन शो मध्ये पोहोचण्यापर्यंत तिचा प्रवास झाला होता.

मात्र आजच्या आधुनिकतेच्या प्रवाहात ही साडी काळाच्या पडद्याआड जाऊ लागली होती. तसेच तिचे विणकर आणि अन्य कारागिरही त्या व्यवसायापासून दूर जाऊ लागले होते. सर्वात दुखद गोष्ट म्हणजे सरकारचेही या साडीकडे दुर्लक्षच झाले होते. त्यामुळेच आता या साडीला पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी नाबार्डने प्रयत्न चालविले असून लवकरच पेडणे तालुक्यातील कोरगाव व डिचोली तालुक्यातील वेळगे येथे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याद्वारे सुमारे 50 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यप्शिबिरासाठी खास केरळहून प्रशिक्षक आणण्यात येणार आहे. त्यानंतर शिबिरार्थीना स्वतः व्यवसाय करण्यासाठी नाबार्डतर्फेच अर्थसाहाय्यही करण्यात येईल तसेच उत्पादित साडय़ांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दरम्यान, राज्याच्या अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत बँकेच्या सुविधा पोहोचविण्यासाठीही नाबार्डतर्फे योजना आखण्यात आली असून त्याद्वारे फिरती बँक संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गोवा राज्य सहकारी बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

या फिरत्या बँकेच्या वाहनात बँकेचे कार्यालयीन कामकाज आणि एटीएम सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याद्वारे बँकेत खाते खोलण्यापासून पैसे भरणे, काढणे आणि कर्ज उपलब्ध करून देण्यापर्यंत सेवा देण्यात येणार आहेत.

सदर वाहन ठराविक कालमर्यादेत राज्यातील विविध दुर्गम भागात जाऊन खास करून वयोवृद्ध आणि दुर्बल घटकांना मदत करण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यादृष्टीने नाबार्ड आणि राज्य सहकारी बँक यांच्यात करार झाला असून दि. 1 जानेवारी रोजी त्यासंबंधीचे पत्र बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी नाबार्डच्या गोवा विभागीय सरव्यवस्थापक उषा रमेश, उपसरव्यवस्थापक वसंत सावर्डेकर, अनंत चोडणकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ड्रग्ज डिलर्सना ‘नो बेल, डायरेक्ट जेल’

Amit Kulkarni

हरमलात 49 हजारांच्या चरससह एकास अटक

Amit Kulkarni

तरुणीची फॅनला गळफास लावून आत्महत्या

Omkar B

डॉ.गोपीनाथ सावकर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

कामत, लोबो यांच्यावर अपात्रतेची ‘टांगती तलवार’

Amit Kulkarni

राज्य निवडणूक आयुक्त सरकारचे बाहुले

Amit Kulkarni
error: Content is protected !!