कुपवाड / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर शासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात बंदी आदेश डावलून दुकाने उघड़ी ठेवत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी कुपवाड परिसरातील सहा दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये चार किराणा दुकानदार व दोन चिकन सेंटर चालकांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व तुषार काळेल यांनी ही कारवाई केली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘ब्रेक द चेन’ धोरणानुसार शासनाने व जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात दूध, मेडिकल व दवाखाने वगळता सर्व किराणा दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तरीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कुपवाड शहरासह बामनोली व विस्तारीत परिसरात काही किराणा दुकाने व चिकन सेंटर खुलेआम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकांने पाहणी केली असता चार किराणा दुकाने व दोन चिकन सेंटरमधून खुलेआम मालविक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार किराना दुकानचालक बालीचाॅद इसाक शेख (वय ३८,रा.कानडवाडी रोड), राजेंद्र बापू माने (वय ३८,रा.अहिल्यानगर बाजारपेठ, कुपवाड), संकेत संजय खोत (वय २१,रा.माधवनगर रोड, कुपवाड), प्रसाद पांडुरंग शिंदे (वय २०,रा.बामणोली गणेशनगर) यांसह मकबुल दिलावर मुजावर (वय २८,रा.कापसे प्लाॅट, कुपवाड) व वलीमहंमद बजलुरअहंमद खान(वय २८,रा.बामणोली) या दोन चिकन सेंटर मालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.


next post