रस्ता तात्काळ खुला करण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी , अन्यथा आंदोलन
प्रतिनिधी/ कास
जावली तालुक्यातील कुसुंबी मुरा येथील आखाडेवस्ती कडे जाणारा रस्त्यावर एकाने दगडी बांध घालुन काटेरी झुडपे टाकुन रस्ता बंद केल्याने आखाडेवस्तीतील नागरीकांची गैरसोय होत असुन तातडीने रस्ता खुला करून संबधीतावर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी जावली तहसीलदार शरद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असुन रस्ता तात्काळ खुला न केल्यास अंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.


डोंगरमाथ्यावर वसलेल्या रस्त्याविना विकासापासुन वंचीत असलेल्या कुंसुंबी मुरा येथील आखाडे वस्तीला दळवळणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी एकीव ते सहयाद्रीनगर या मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी २०११ साली आमदार शिंवेद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडातुन मोळेश्वर ते कुंसुबीमुरा आखाडे वस्ती असा दीड किमीचा जमीन कटींग करून कच्चा खडीकरनाचा नवीन रस्ता बनविला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक याच मार्गावरून वाहतुक करत आहेत. या रोडवर उन्हाळ्यात वाहनांची वाहतुक सुरु असते तर पावसाळ्यात चिखलामुळे वाहनांची वाहतुक बंद होते. मात्र मुख्य रसत्यावर येण्यासाठी नागरीकांना व शाळेतील मुलांना हाच मार्ग सोईचा ठरतो. या मार्गावर मधोमधच धोंडीबा धाऊ आखाडे या नावाच्या व्यक्तीने दगडी बांध घालुन व काटेरी झुडपे लावुन रस्ता पुर्णपणे बंद केला आहे त्यामुळे स्थानिंकाना वाहतुक प्रवासाची मोठी अडचण होत आहे. तरी या रस्त्याशी त्या व्यक्तीचा काहीही संबंध नसुन हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन संबधींतावर कठोर कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा आठ दिवसांनंतर प्रशासनाच्या दालनापुढे आखाडे वस्तीतील नागरीक आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे.