Tarun Bharat

कृष्णरंगें सुरंग जाले

Advertisements

कृष्णाचे सर्व वऱहाडी जेवायला बसले होते. मग हेमपात्रात कृष्णाचे चरण प्रक्षाळून शुद्धमतीने हात जोडून विनंती केली-यदुराया! रुखवताचा स्वीकार करा. आपण विश्वपती आहात, आपल्या वैभवापुढे आमचे वैभव किती असणार! आमच्या या सेवेला आपण स्वीकारावे. त्यांचा भक्तीभाव पाहून भगवान संतोषले. पंक्ती वाढायला नवविधा भक्ती जणू सवीज होऊन आल्या होत्या. कृष्णापुढे जणूं चारी मुक्ती नाचत होत्या. जे हवे ते देत होत्या. जे नऊ जणींनी वाढले त्याची पूर्तता चौघींनी केली. पंक्तीत सारेजण तृप्त झाले. साऱया पक्वांन्नाच्या स्वादापेक्षा कृष्णदर्शनाचा स्वाद अधिक गोड लागत होता. कृष्णाच्या पंक्तीला जे जेवले ते तृप्त झाले. समाधानाने ढेकर देऊ लागले. सारे स्वानंदाने जेवत होते. शुद्धमतीचे भाग्य केवढे थोर! जेवणाचा स्वाद प्रत्यक्ष कृष्णाने घेतला. भीष्मक राजा आग्रह करत वाढत होता. यादव पुरे! पुरे! म्हणत होते. ब्राह्मण पोटावरून हात फिरवत ढेकर देत होते. त्यांची शेंडी तडतडत होती. भोजन झाले. उष्टावण झाले. श्रीकृष्णाने सोन्याची अंगठी पात्राखाली ठेवली.

देखोनि आनंदली शुद्धमती । भीमकीभाग्य वानू।किती ।  कृष्णमुद्रा चढली हातीं । शेषप्राप्ती निजभावें ।  कृष्णपंक्ती जे जेविले । ते सवेंचि संसारा आंचवले ।  कृष्णरंगें सुरंग जाले । विडे घेतले सकळिकी । कृष्ण देखोनिया डोळां । भीमकीच्या सख्या सकळा । विस्मित राहिल्या वेल्हाळा । आणिक डोळां नावडे ।  कृष्णउच्छिट घेऊनि हातीं। वेगें निघे शुद्धमती ।  संतोषोनिया श्रीपती । प्रसाद देती निजमाळा ।

कृष्णप्रसाद सुमनमाळा । शुद्धमती घाली गळां ।

लाज विसरोनि वेल्हाळा । चरणकमळा लागली ।

कृष्णाची ती अंगठी पाहून शुद्धमतीला आनंद झाला. ती म्हणाली – काय हे आमच्या रुक्मिणीचे भाग्य! तिच्या हातात आताही कृष्णमुद्रा आली व तिला कृष्णाच्या अन्नाचा शेष प्राप्त झाला. तो देवादिकांना सुद्धा तप करून प्राप्त झाला नाही. कृष्णाच्या पंक्तीला जेवले ते मुक्त झाले. कृष्णरंगाने रंगलेले विडे सर्वांनी घेतले. कृष्ण डोळय़ांनी पाहिल्यावर रुक्मिणीच्या सख्या विस्मित होऊन ते रूप पाहतच राहिल्या. त्यांच्या डोळय़ांना आता कोणतेही अन्य रूप पहायला नावडे, असे झाले. कृष्णाने आपल्या गळय़ातील फुलांचा हार शुद्धमतीला दिला. तो तिने प्रसाद म्हणून आपल्या गळय़ात घातला. लाज सोडून तिने कृष्णाला दंडवत घातला.

कृष्णास रुखवत शेवती । देतां न कळे दिवसराती।

ज्योतिषी रायातें म्हणती । उदयप्राप्त हो आली ।

वेगी मंडपासी चला । घडवटें आधीं घाला ।

उशिर न लावा जी फळा । यादवां सकळां सांगिजे।

नमस्कारूनियां श्रीपती । मंडपा आली शुद्धमती ।

उष्टावण भीमकी हातीं । परम प्रीती दीधलें ।

कृष्णाचे रुखवात करताना दिवस रात्र कसे सरले हे कळलेच नाही. ज्योतिषी राजाला म्हणू लागले – सूर्योदयाची वेळ आली. लवकर आवरून सर्वजण लग्नमंडपाकडे चला.

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

आदिकवी महर्षी वाल्मिकी

Patil_p

केंद्र-राज्य संबंधात तणाव

Patil_p

लसीच्या उत्सुकतेची अतिशयोक्ती

Patil_p

जागतिक चार्जर बाजारात देशाचा 50 टक्के हिस्सा ?

Patil_p

मनही आजारी पडते हे लक्षात घ्यायला हवे…

Patil_p

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (42)

Patil_p
error: Content is protected !!