Tarun Bharat

कृष्णाकाठी भक्तांची मांदियाळी

 

Advertisements

वार्ताहर/   एकसंबा

कल्लोळ (ता. चिकोडी) येथील कृष्णाकाठावर शुक्रवारी 24 रोजी विशाळी यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. विविध गावातून हजारो भाविकांनी कृष्णा नदीत पवित्र स्नान करून देवदर्शन घेतले. यंदाच्या विशाळी यात्रेला कृष्णा काठी हजारो भक्तांची मांदियाळी पहावयास मिळाली.

प्रारंभी एकसंबा गावातील मानाच्या प्रमुख पाच ग्रामदैवत बिरेश्वराच्या दोन पालख्या, संतुबाई, एकनाथी, महादेवाच्या पालख्यांची गुरुवारी रात्री प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढून कल्लोळ येथील कृष्णा नदीकाठावरील मंडपात पालख्या बसविण्यात आल्या. सकाळी कृष्णा नदीमध्ये उत्सव मूर्तीस स्नान घालण्यात आले व विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी कृष्णा नदीत पवित्र स्नान केले. दुपारनंतर भाविकांनी देवास नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाचा लाभ घेतला तर अनेक कुटुंबीयांनी नदीकाठी जेवणाचा आनंद लुटला.

दुपारी दोननंतर एकसंबा परिसरातील सासनकाठय़ांचे वाजत गाजत नदीकाठी आगमन झाले. यावेळी नदीकाठी गुलालाची व भंडाऱयाची उधळण करण्यात आली. त्याचबरोबर पालखीसमोर भाकणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी पाचनंतर एकसंबा येथील मानाच्या ग्रामदैवत बिरेश्वराच्या दोन पालख्या, संतुबाई, एकनाथी, महादेवाच्या पालख्यांचे कृष्णा काठावरुन एकसंब्याकडे प्रस्थान झाले. एकसंबा येथील जनावरांच्या दवाखान्याजवळ असणाऱया पादकट्टय़ावर पाच पालख्या आसनस्थ झाल्या. रात्री अंबिलीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर रात्री मरगुबाई मंदिरात बिरेश्वराच्या पालख्या वसतीसाठी नेण्यात आल्या.

विशाळी यात्रेला नदीच्या पवित्र स्नानाने सुरुवात होते. यासाठी परिसरातील हजारो भाविक कृष्णाकाठी येत असतात. अनेक वर्षापासून यात्रेस बैलगाडीने येण्याची परंपरा आजही अनेकांनी कायम ठेवली आहे. बैलगाडय़ांमुळे यात्रेमध्ये पारंपरिक साद दिसून आला. तसेच दुचाकी, चारचाकीस्वारांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने भाविकांना नेहमीप्रमाणे यंदाही ट्राफिकचा सामना करावा लागला.

मलिकवाड येथे विशाळी यात्रा

मलिकवाड : शुक्रवार 24 रोजी मलिकवाड येथील दूधगंगा नदीकाठावर विशाळी यात्रा उत्साहात झाली. सकाळपासून नदीकाठावर भाविकांनी स्नान व दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी विविध गावातील पालख्यांचे आगमन झाले. महिलांनी पाणी घालून पालख्यांचे स्वागत केले. त्यानंतर पालख्या नदीकाठावर आल्या. यावेळी स्नान व महानैवेद्याचा कार्यक्रम झाला. सदर यात्रेचा मान हा नणदीकर सरकारांचा आहे. नदीकाठावर असलेल्या मल्लिकार्जुन व म्हसोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात विविध पदार्थ, खेळणी, साहित्यांची दुकाने थाटली होती. नदीकाठावर म्हसोबा, थळोबा, नणदी येथील हालसिद्धनाथ, वडगोल येथील बिरोबा व मरगुबाई, मुत्तलकोडी बिरदेव, भैनाकवाडी येथील मुरसिद्धेश्वर अम्मणगी येथील मल्लिकार्जुन देवाच्या पालख्या दाखल झाल्या होत्या. दुपारनंतर हालसिद्धनाथांची भाकणूक झाली. सायंकाळी पालख्यांची बसस्थानक परिसरात भेटीगाठी झाल्यानंतर गावांकडे प्रस्थान केले. 

आज यात्रेचा मुख्य दिवस

मरगुबाई मंदिरात वसतीसाठी असणाऱया बिरेश्वराच्या पालखीची शनिवारी 25 रोजी दुपारी 3 वाजता प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावची वेस ओलांडून सायंकाळी 5 च्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच मंदिराच्या प्रवेशद्वारास श्रीफळ उडविण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

Related Stories

बैलूर भागात सुगी हंगाम जोरात

Patil_p

गोळीबारप्रकरणी आणखी 6 जणांना अटक

Patil_p

एटीएम मशीन फोडण्याचा रामतीर्थनगर येथे प्रयत्न

Amit Kulkarni

परिवहनच्या 195 कर्मचाऱयांची बदली

Amit Kulkarni

पावसाचा जोर वाढला की हृदयाची धडधडही वाढतेय….

Patil_p

पंतनगर येथे माजी सैनिकाचे घर फोडले

Patil_p
error: Content is protected !!