Tarun Bharat

कृष्णाकाठ योजनेसाठी 10 हजार कोटी

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची घोषणा: तिसऱया टप्प्यातील काम 2023 पर्यंत पूर्णत्वास: कृती आराखडा तयार करणार

प्रतिनिधी / बेंगळूर

कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱया टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी विधानसभेत केली आहे. गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उत्तर कर्नाटकातील पाणीपुरवठा योजनांना अनुदान न दिल्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे येडियुराप्पा यांनी गुरुवारी रात्रीच अर्थखात्यातील अधिकाऱयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.

शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजावेळी मुख्यमंत्र्यांनी कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱया टप्प्याच्या कामासाठी आणि 30
खेडय़ांचे पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याचे घोषित केले. हे काम 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. आपण गुरुवारी रात्री अर्थखात्यातील अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी सायंकाळी दिल्लीला जाऊन केंद्रातील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अधिक अनुदान मिळविण्याचा प्रयत्न करेन. ही बाब अर्थसंकल्पात घोषित केली नव्हती, असे बी. एस. येडियुराप्पा म्हणाले.

उत्तर कर्नाटकातील आमदारांचा दबाव

कृष्णा नदीच्या पाणीपुरवठय़ासंबंधी येडियुराप्पा यांनी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न केल्याने उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह उत्तर कर्नाटक भागातील 8-10 आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. अर्थसंकल्प मांडल्यानंतर कारजोळ यांनी येडियुराप्पांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर कृष्णाकाठ योजनेसाठी 20 हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तुम्ही अर्थसंकल्पात या योजनेसाठी अनुदानच दिले नाही. त्यामुळे जनतेसमोर जायचे तरी कसे?, असे सांगून नाराजी व्यक्त केली.

त्यापाठोपाठ विजापूर, बागलकोट, रायचूर, कोप्पळ भागातील भाजप आमदारांनी देखील नाराजी व्यक्त करून अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यांनी जेवणाच्या निमित्ताने एकत्र येऊन बैठक घेतली होती. त्यानंतर काही जणांनी गोविंद कारजोळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कृष्णा नदीशी संबंधीत योजनांसाठी अनुदान द्या. अन्यथा ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे कारजोळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधला होता.

योजना…

  • कृष्णा नदीच्या पाणीपुरवठय़ासंबंधी तरतूद नव्हती
  • उत्तर कर्नाटकातील आमदारांनी  व्यक्त केली होती नाराजी
  • येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांशी  चर्चा करून घेतला निर्णय

योजनेसाठी कोठूनपैसे आणणार?

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी, कृष्णाकाठ योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा करणे आनंदाची गोष्ट आहे. पण या योजनेसाठी कोठून पैसे आणणार?, असा प्रश्न उपस्थित केला. सरकारजवळ पैसाच नाही, मग पैसे कसे पुरविणार. गुरुवारी अर्थसंकल्प मांडतानाच हा मुद्दा समाविष्ट करता आला असता किवा अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी उत्तर देताना याविषयी स्पष्टीकरण देता आले असते. काही झाले तरी ही घोषणा केवळ आश्वासनापुरतीच असू नये, असे सांगितले. त्यावर उत्तर देताना येडियुराप्पा यांनी, योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका बाळगू नका. तीन वर्षांत योजना पूर्ण करेन. त्यासाठी लवकरच कामांना चालना देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Related Stories

निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शनसाठी जोरदार निदर्शने

Amit Kulkarni

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

बस सेवा झाली पूर्ववत प्रवाशांमधून समाधान :

Patil_p

बेळगावच्या आणखी एका वकिलाची न्यायाधीशपदी नियुक्ती

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीने बसविलेले 20 पैकी 10 सीसीटीव्ही बंद

Amit Kulkarni

कै. एल. आय. पाटील यांना श्रध्दांजली

Patil_p