Tarun Bharat

कॅन्टोन्मेंटचे वीजबिल भरण्यासाठी निधी मंजूर करा

Advertisements

कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत अध्यक्षांची मागणी

 प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांचा विकास करताना शहरातील वाहतूक कॅम्पमधील रस्त्यांवरून वळविण्यात आली. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विकास करण्यात आलेल्या रस्त्यांवर गटारी बांधण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा मुद्दा कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत पुन्हा चर्चेत आला. या रस्त्यांचा विकास आणि विद्युत बिल, पाणीपट्टी भरण्याकरिता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आली.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही रस्त्यांचा विकास करण्यात आला. विशेषतः खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले. पण येथील गटारीचे बांधकाम झाले नसल्याने ग्लोब थिएटरजवळ पावसाचे पाणी साचत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पावसाचे पाणी मिलिटरी क्वॉर्टर्समध्ये साचून रहात आहे. तसेच रस्त्याची उंची वाढविण्यात आल्याने येथील संरक्षक भिंतीची उंची कमी झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये संरक्षक भिंतीची उंची वाढविण्याची तरतूद का केली नाही, प्रशासनाने भिंतीची उंची वाढविण्यासाठी तरतूद करावी, अशी सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी केली.

शहरातील बहुतांश वाहतूक कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्त्यांवरून होते. तसेच अवजड वाहने कॅम्प परिसरातून वळविण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ते खराब झाले असून, काही रस्त्यांचा विकास जिल्हा प्रशासनाने केला आहे. पण सदर कंत्राटदाराचे 82 लाखाचे बिल स्मार्ट सिटीने अदा केले नाही. तसेच अन्य रस्त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. कॅन्टोन्मेंटच्या बहुतांश रस्त्यांचा वापर शहरवासीय करीत असतात. तरीदेखील या रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. याबद्दल ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी खंत व्यक्त केली.

राज्य शासनाकडून एसएफसी अनुदान मंजूर करण्यात आले नसल्याने पाणी बिल, पथदीप बिल थकले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना वेतन देणे मुश्कील बनले आहे. सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीतील पथदीपांचे बिल भरले नसल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पथदीप बंद झाले आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था आणि पथदीपांअभावी वाहनांचे अपघात होत आहेत. येथील रस्त्यांचा विकास करावा, तसेच राज्य शासनाकडून एसएफसी अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती कॅन्टोन्मेंटच्यावतीने ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी बैठकीत केली.

रस्ता करण्याबाबत तसेच कंत्राटदाराच्या बिलाबाबत स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यकारी संचालकांशी चर्चा करण्याची ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली. तसेच याबाबत बैठक घेऊन विकासकामे मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा, कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर, अभियंते सतीश मन्नूरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

प्राणी संग्रहालयाच्या दैनंदिन महसुलात वाढ

Amit Kulkarni

ज्योती महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

Amit Kulkarni

पूरग्रस्तांचे 50 एकरात पुनर्वसन

Amit Kulkarni

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात पाण्याचे वाटप होणार : मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

आंदोलनाची धास्ती, कामाला सुरुवात, मात्र रास्तारोको करणारच

Patil_p

चीनच्या राष्ट्रपतींच्या पुतळय़ाचे दहन

Patil_p
error: Content is protected !!