Tarun Bharat

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची चाळण

पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याची दुरवस्था : वाहनधारकांचे हाल, रस्ता दुरुस्त करण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी वाहतूक कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यावरून वळविण्यात आली होती. परिणामी कॅम्पमधील रस्ते खराब झाले असून रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र रस्ता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्ते वाहनधारकांना धोकादायक बनले असून हाल होत आहेत. खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. खानापूर रोड, कॉलेज रोड, जुना धारवाड रोड, काँग्रेस रोड, सांवगाव रोड अशा विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने हे रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले होते. काही रस्त्यांचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कॅम्पमधील स्वतंत्रता मार्ग, शर्कत पार्क, शौर्य चौक आणि अरगन तलाव रस्त्यामार्गे वळविण्यात आली आहे. तसेच मिलिटरी महादेव शेजारील चॅपेल रोडचा वापरदेखील करण्यात आला. सध्यादेखील या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठय़ाप्रमाणात असून काँग्रेस रोडवरून ये-जा करणारे वाहनधारक चॅपेल रोडचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि कॉलेज रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण करूनही अद्याप ही वाहतूक कॅम्पमधील रस्त्यावरून सुरू आहे. अवजड वाहने, परिवहन मंडळाच्या बस आदीसह सर्व वाहनांची वर्दळ कॅम्पमधील रस्त्यांवर वाढली होती. त्यामुळे कॅम्पमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ते खराब झाले असून, सर्वत्र खड्य़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आसदखान दर्गा परिसरातील मार्गावरील रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच वाहनधारकांचे अपघात घडत असून सदर रस्ता वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी उपलब्ध नाही. तसेच रस्त्याचा विनियोग महापालिका हद्दीतील नागरिक करीत असतात. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत किवा राज्य शासनाकडून रस्त्याच्या विकासाकरिता स्मार्ट सिटी योजनेमधून निधी मंजूर करावा, अशी विनंती बैठकीवेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने केली होती. पण रस्त्याच्या दुरुस्तीकरिता देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहे. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

चेंबर निवडणूक विकास पॅनेलने जिंकली

Patil_p

भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी

Amit Kulkarni

एस. पी. घाळी ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

Amit Kulkarni

लायन्स क्लबतर्फे प्रदूषण नियंत्रणाबाबत जागृती

Patil_p

‘बिम्स’च्या प्रशासक पदी ‘या’ आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती

Archana Banage

शहरात अधिकतर सरकारी शाळांना मैदानेच नाहीत

Omkar B