Tarun Bharat

कॅन्टोन्मेंट रुग्णालयात लवकरच नगर आरोग्य केंद्र

Advertisements

कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांची माहिती : शासनाच्या योजना नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी हालचाली 

प्रतिनिधी / बेळगाव

सरकारी योजनांचा लाभ कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने याकरिता हालचाली चालविल्या आहेत. आता लवकरच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयात नगर आरोग्य केंद्राची सुरुवात करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचा लाभ कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील नागरिकांना मिळत नाहीत. कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार केंद्र शासनाच्या अखत्यारित चालतो. पण हद्दीतील नागरिक आमदार व खासदारच्या निवडणुकीवेळी मतदानाचा हक्क बजावतात. मात्र त्यांना शासनाकडून राबविण्यात येणाऱया योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाकडून राबविण्यात येणाऱया योजना कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने याकरिता हालचाली चालविल्या आहेत.

एड्स निवारण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या विषयावर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील रस्ते व उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी सुविधांचा मुद्दा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत उपस्थित झाला होता.

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयाची पाहणी

जिल्हा रुग्णालयाकडून राबविण्यात येणाऱया आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅन्टोन्मेंटने प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे याबाबत जिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱयांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. कॅन्टोन्मेंट बोर्डची इमारत प्रशस्त असून या ठिकाणी 50 बेडचे रुग्णालय सुरू करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करता येऊ शकतात, असे सांगितले.

यावेळी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबाबत कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा व जिल्हा आरोग्य अधिकारी मुन्याळ यांच्यात चर्चा झाली. प्रारंभी नगर आरोग्य केंद्र सुरू करून केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पुढे आला. याबाबत लवकरच निर्णय घेऊन नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती श्रीबर्चस्वा यांनी दिली.

या पाहणीवेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालय अधीक्षक महालिंगेश्वर ताळूकर व कॅन्टोन्मेंट बोर्डचे आरोग्य अधिकारी डॉ. अनगोळकर उपस्थित होते.    

Related Stories

परिवहनचे कर्मचारी ऑक्टोबरच्या वेतनाविना

Patil_p

सांस्कृतिक-मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची मुभा द्या

Patil_p

दहावीचा निकाल उंचावण्यासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

चिकोडीत आग; लाखोंचे साहित्य खाक

Amit Kulkarni

कोरोना जागृतीसाठी तिरूपतीचा सायकल प्रवास

Patil_p

वडगाव, अनगोळ परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni
error: Content is protected !!