Tarun Bharat

कॅम्पमध्ये जलवाहिनीला गळती

मोठय़ा प्रमाणात पाणी वाया, टिळकवाडीचा पाणीपुरवठा ठप्प : नागरिकांना नाहक त्रास

प्रतिनिधी /बेळगाव

शहरात पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने विविध परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशातच जलवाहिन्यांना गळत्या लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. टिळकवाडी परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला रविवारी सायंकाळी कॅम्प परिसरातील आसदखान दर्ग्याजवळ गळती लागली. परिणामी सोमवारी टिळकवाडी भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली.

जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानादेखील शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहर आणि उपनगरांतील गळती लागलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे. शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या लागल्याने पाणी वाया जात आहे. अशातच रविवारी सायंकाळी साडेसात वाजता आसदखान दर्ग्याजवळ जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली. टिळकवाडी परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. गळती लागल्याची माहिती मिळण्यास विलंब झाल्याने भरपूर पाणी वाया गेले. आर्मी प्रायमरी शाळेसमोरील रस्त्यापर्यंत पाणीच पाणी झाले होते. तसेच हे पाणी वाहत ग्लोब थिएटरपर्यंत पोहोचले होते.

कॅम्प परिसरात जलवाहिनीला गळती लागल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील जलवाहिनी असल्याचा समज निर्माण झाला होता. पण कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता ही जलवाहिनी कॅन्टोन्मेंट बोर्डची नसल्याचे सांगण्यात आले. रविवारी सुटीचा दिवस होता. तसेच सायंकाळी उशिरा गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना देण्यात आली असता, जलवाहिनीला कोणत्या ठिकाणी गळती लागली याची माहिती नव्हती. सोमवारी दुपारपर्यंत जलवाहिनी शोधण्यात अधिकाऱयांचा वेळ गेला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सध्या सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशातच गळतीमुळे टिळकवाडी भागात सोमवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

जोतिबा मंदिरात कटल्याचे जल्लोषात आगमन

Amit Kulkarni

लेंडीनाल्याची अधिकाऱयांकडून पाहणी

Patil_p

परतीच्या पावसाने उडाली शेतकऱयांची झोप

Patil_p

नाव नाही ते गाव, कर्नाटक सरकारचा अजब कारभार

Tousif Mujawar

सावगाव खून प्रकरणातील इतरांनाही अटक करा

Amit Kulkarni

संपामुळे पोस्ट कार्यालयात नागरिकांच्या रांगा

Amit Kulkarni