Tarun Bharat

केंद्राकडून कर्नाटकाला सापत्नभावाची वागणूक

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची टीका : अनुदान देण्यात कर्नाटकवर अन्याय : अतिवृष्टीवरील चर्चेवेळी आरोप

प्रतिनिधी /बेळगाव

केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात कर्नाटकावर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी विधानसभेत केला. अतिवृष्टीवरील चर्चेवेळी त्यांनी सरकारवर हा आरोप केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कर्नाटकातून राज्यसभेवर गेल्या आहेत. भाजपचे 25 खासदार आहेत. केंद्र सरकारकडून कर्नाटकावर वारंवार अन्याय होत असताना हे खासदार काय करीत होते? त्यांनी कधीच का आवाज उठविला नाही? असे प्रश्न उपस्थित करीत पंधराव्या वित्त आयोगाने कर्नाटकाला 5 हजार 495 कोटी देण्याची शिफारस केली होती. केंद्राने ते अद्याप दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

महसूलमंत्री आर. अशोक हे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत कर्नाटकाला किती अनुदान मिळाले, यासंबंधी चुकीची माहिती देत आहेत. एनडीआरएफ व एसडीआरएफ निधीतून कमीत कमी अनुदान मिळाले आहे. नरेंद्र मोदींमुळे कर्नाटकावर अन्यायच झाला आहे. कर्नाटकातून कर रुपातून 3 लाख कोटी महसूल केंद्राला जातो. त्यापैकी केवळ 50 ते 55 हजार कोटी परत दिले जातात. हा अन्याय नव्हे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये घालण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. दरवषी 2 कोटी उद्योग निर्मितीची ग्वाही दिली होती. आता उद्योग विचारले तर भजी विकायचा सल्ला देतात. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून आर्थिक विषयावर बोला तर तुम्हाला कळेल, असा टोला सिद्धरामय्या यांनी हाणला.

याला आक्षेप घेत महसूलमंत्री आर. अशोक यांनी हिंदुत्वाची तुम्हाला भीती का वाटते? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी काँग्रेस व भाजप आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. देशाला कोणी लुटले? याविषयी एकमेकांवर आरोप करण्यात आले. त्यामुळे गदारोळ माजला. पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनीही नरेंद्र मोदी यांची बाजू मांडत कोरोनामुळे संपूर्ण देश आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. यापूर्वी देशात 6 कोटी 25 लाख लस निर्मिती होत होती. आता पंतप्रधानांनी 260 कोटी लसींची निर्मिती केली आहे. ही साधना नव्हे का? असा प्रश्न उपस्थित केला.

खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या चर्चेत भाग घेत लस कोणाला मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला. डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी लसीची निर्मिती नरेंद्र मोदींनी नाही तर खासगी कंपन्यांनी केली आहे. ऑक्सिजनशिवाय 50 लाख जणांचा मृत्यू झाला आहे, यावर बोला, असे सांगत या विषयाकडे लक्ष वेधले.

Related Stories

जितो लेडीज विंगतर्फे तन्वी दोड्डण्णावरचा गौरव

Amit Kulkarni

किरण ठाकुरांना खरी लोकमान्यता

Amit Kulkarni

बागायतच्या अनुदानाने चिंच उत्पादनात वाढ

Amit Kulkarni

ऑनलाईनद्वारे व्यवसाय परवाना नूतनीकरण सोयीचे

Amit Kulkarni

कांदा दरात वाढ; बटाटा दर स्थिर

Patil_p

एम्स हॉस्पिटल बेळगावात तातडीने स्थापन करा

Amit Kulkarni