मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती ही राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी गेल्या महिन्याभरापासून करत आहेत. त्यांनी पंतप्रधानांना वारंवार याबद्दल आवाहन देखील केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. जगही ते पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
यासोबतच कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावं लागेल. याकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं. मात्र कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या कोर्ट घेईल, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

