Tarun Bharat

केंद्रीय समितीकडून ‘पंचनाम्यांचे पंचनामे’

Advertisements

वादळात वीज खांब कोसळणार, याची वाट पाहू नये

केंद्रीय पाहणी पथकाकडून वीज कंपनीला सूचना

मालवण:

‘तौक्ते’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी आणि स्थानिक प्रशासनाकडून केलेल्या पंचनाम्यांची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय पाहणी पथकाचा रविवारचा दौरा होता. गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार कोटीचे मदत पॅकेज जाहीर होणार का, हा आमचा विषय नाही, असे पथकाचे प्रमुख अशोक परमार यांनी तारकर्ली येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 परमार यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय पथकाने रविवारी सायंकाळी मालवण शहर, वायरी, तारकर्ली येथील पडझडीची पाहणी केली. यात घरांचे नुकसान, कोसळलेली झाडे, वीज खांब आदी नुकसानीची पाहणी करण्यावर समितीचा भर होता. तसेच नुकसानीसंदर्भात काही महत्वाच्या मुद्यांवरही त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. दौऱयानिमित्त काही प्रशासकीय अधिकाऱयांमध्येही याविषयीची चर्चा सुरू होती.

वीज खांब कधी बदलणार?

मालवण पालिकेसमोर समिती आली असता, त्यांना चक्रीवादळात मोडून पडलेले वीज खांब दाखविण्यात आले. समितीने हे वीज खांब खूप जुनाट वाटतात. तुम्ही असे खराब झालेले वीज खांब ठराविक वर्षांनी बदलत नाही का? उभारल्यानंतर ते सुस्थितीत आहेत की नाहीत हेही पाहिले गेले पाहिजे. चक्रीवादळ येणार आणि त्यात असे जुनाट वीज खांब कोसळणार हे बरोबर नाही, असेही समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

शहरातील एका भागात घराच्या नुकसानीची पाहणी करताना संबंधित घरमालकांकडे समितीने झालेल्या पंचनाम्याची प्रत तपासली. पंचनाम्याशी संबंधित काही प्रश्न विचारून पंचनाम्याची पडताळणीही केली. घरमालकांनी आम्ही अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले. समितीत परमार यांच्यासमवेत केंद्रीय अर्थ विभागाचे अभय कुमार, केंद्रीय कृषी विभागाचे सिंग, केंद्रीय ऊर्जा विभागाचे जे. के. राठोड, रस्ता विभागाचे चाफेकर, मत्स्य विभागाचे अशोक कदम आदींचा समावेश होता. वरिष्ठ अधिकारी तुषार मठकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपस्थित होते. तारकर्ली येथे सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासमवेत समितीची बैठक होणार होती.

माड, सुपारी, कोकणी मेव्यासंदर्भात निवेदन

भाजपचे भाऊ सामंत व विलास हडकर यांनी वादळामुळे नुकसानग्रस्त आंबा, माड, सुपारी, कोकण, फणस, काजू बागायतदार तसेच घरे, गोठे, दुकाने, शासकीय इमारती आदींना भरीव आर्थिक मदत मिळावी, असे निवेदन समितीस सादर केले. माड, कोकम, सुपारी, काजू, फणस व आंब्याचे एक धरते झाड कोसळल्यास त्याचे नुकसान कसे मोठे असते, यासंदर्भात तपशीलवार माहिती निवेदनातून देण्यात आली.

केंद्र सरकार महाराष्ट्राला काय देणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नुकसानीची हवाई पाहणी करून गुजरातसाठी 1 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. आता केंद्रीय पाहणी समितीने 3 जूनपासून पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्राला केंद्राकडून किती मदत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

सेवानिवृत्त पोलिस महादेव कानसे यांचे निधन

NIKHIL_N

बाप्पा बनवण्यासाठी ‘प्रतिक’ व ‘रोहन’ ची मूर्तीकारी

Patil_p

जाकादेवी परिसर चिरेखाण मालक संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश सुपूर्द

Patil_p

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

NIKHIL_N

शहरातील वाहतूक व्यवस्थेवर आता अत्याधुनिक नजर

Patil_p

उत्तर रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या वतीने निवेदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!