ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने गुरुवारी सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.


ते म्हणाले, यापुढे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिला जाणार नाही. तसेच सोशल मीडियाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी तीन महिन्यात करावी लागणार आहे. सोशल मीडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या फेकन्यूज, दहशतवादी, देश विघातक कारवाया रोखण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
महिलांसंबधीच्या आक्षेपार्ह पोस्ट संबधित कंपन्यांना 24 तासांच्या आत हटवाव्या लागतील. कंपन्यांनी नियमांचे पालन केल्याबद्दल दरमहा सरकारला अहवाल द्यावा लागेल. तसेच 15 दिवसांत तक्रारींचे निराकरण करावे लागणार आहे.


यासोबतच ओटीटी आणि डिजिटल मीडियाला त्यांच्याबद्दलची सर्व माहिती जाहीर करावी लागेल. पण हे रजिस्ट्रेशन नसणार आहे. यासह तक्रार निवारणासाठी देखील व्यवस्था करावी लागेल, जी ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म अशा दोन्हींसाठी असेल.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, सोशल मीडिया भारतात व्यवसाय करू शकते. यात कोणतीही अडचण नाही. सोशल मीडियामुळे सामान्य भारतीय मजबूत झाला आहे. यासाठी आम्ही सोशल मीडियाचेही कौतुक करतो.