ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे नुकतेच केंद्र सरकारने सांगितले आहे. याबाबत माहिती देताना केंद्राकडून सांगण्यात आले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही.


त्यातच आता केंद्र सरकारच्या उत्तरावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे असा टोलाही त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
- सरकारवर खटला दाखल करा
ते म्हणाले, ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का हे सांगायला हवे. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.