Tarun Bharat

केंद्र सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावरच चुली अन् भाकरी

-घरगुती गॅस दर वाढीविरोधात `राष्ट्रवादी’कडून निषेध आंदोलन

प्रतिनिधी/कोल्हापूर

 केंद्र सरकारकडून दोनच दिवसापूर्वी घरगुती गॅस दरात 25 रूपये वाढ केली आहे. या दरवाढी विरोधात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली मांडून त्यावरती भाकरी भाजून केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. याचबरोबर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर सातत्याने हिन टिका करणाऱया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाही योग्य वेळी धडा शिकवण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

 गेल्या काही दिवसापासून सातत्याने केंद्र सरकारकडून इंधन दरात वाढ होत आहे. पेट्रोल दराची शंभरी पार झाली आहे. डिझेलचा दरही शंभरीवर येवून ठेपला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असतानाच, केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅस दरात 25 रूपये वाढ करून, नागरीकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर चुली मांडून अनोखे आंदोलन केले.

  जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहर अध्यक्ष आर के पोवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी स्टेडियम येथील शहर पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडत त्यावर भाकरी थापत मोदी सरकारचा निषेध केला. घरगुती गॅसचे दर 838 रुपयांपर्यंत, तर पेट्रोलचे दर 105 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोरोनाच्या संकटात महागाई वाढवून केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. दर वाढल्याने गॅस घेणे परवडत नाही. त्यामुळे अच्छे दिनाच्या गोलगप्पा मारणाऱया मोदी सरकारने पुन्हा एकदा चुलीवर जेवण करण्यास भाग पाडले आहे, अशी टिका आंदोलनात सहभागी महिलांनी केली.

 व्ही बी पाटील, आर के पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 7 वर्षाच्या कारभारावर सडकून टिका केली. या आंदोलनात राजू लाटकर, जहिदा मुजावर, सुनिता राऊत, शितल तिवडे, नितीन पाटील, जयकुमार शिंदे, मधुकर जांभळे, रमेश पोवार, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवे, सुहास साळोखे, सुनील काटकर, रियाज कागदी, संजय पडवळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

`गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे’

`गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे’ यासह अन्य घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी नागरीकांनीही गर्दी केली होती. स्वयंपाक गॅस आणि इंधन दरवाढ मोदी सरकारने आटोक्यात आणली नाही तर, याही पेक्षा उग्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी दिला.

गोपीचंद पडळकरांना आवर घाला, अन्यथा गय नाही

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे अनेक द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हिन पातळीवरील टीका करत आहेत. भाजपाने त्यांना आवर घालावा, अन्यथा पडळकर कोल्हापूरात आले तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ए. वाय. पाटील यांनी दिला.

Related Stories

“पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय” पाक मंत्र्याचं वक्तव्य

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Archana Banage

सोमय्यांना भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले; जिल्हा बँकेची बदनामी थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी

Abhijeet Khandekar

केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण संविधानिक मूल्याच्या विरोधात

Archana Banage

शाहूंच्या खासबागेत रंगणार कुस्त्यांचे मैदान; राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षांनिमित्त आयोजन

Abhijeet Khandekar

खुपिरे राष्ट्रीय पेयजल योजनेचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage