बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा


प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सहाव्या बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने विश्रुत स्ट्रायकर संघाचा 16 धावांनी तर स्पोर्ट्स ऑन संघाने मोहन मोरे संघाचा 19 धावानी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. पार्थ पाटील (केआर शेट्टी), शतक गुंजाळ (स्पोर्ट्स ऑन) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात केआर शेट्टी संघाने 20 षटकात 9 बाद 168 धावा केल्या. वैष्णव संघमित्राने 4 षटकार, 3 चौकारासह 57, पार्थ पाटीलने 3 षटकार, 2 चौकारासह 36 चेंडूत 52 धावा करून दोघांनीही अर्धशतके झळकाविली. विश्रुततर्फे रब्बानी दफेदारने 35 धावात 4 तर मदन बेळगावकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर्सचा डाव 19.2 षटकात सर्व बाद 152 धावात आटोपला. अंगदराज हित्तलमनीने 8 चौकारासह 54, मिलिंद चव्हाणने 5 चौकारासह 27, मदन बेळगावकरने 1 षटकार, 2 चौकारासह 19 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे पुणीत दिक्षितने 17 धावात 2, आनंद माळवीने 28 धावात 2, पार्थ पाटीलने 30 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने 20 षटकात 7 बाद 162 धावा केल्या. त्यात शतक गुंजाळने 1 षटकार, 4 चौकारासह 43, दर्शन पाटीलने 1 षटकार, 3 चौकारासह 39, आकाश पत्तारने 1 षटकार, 2 चौकारासह 32 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे आनंद कुंभारने 3 धावात 2 तर दर्शन मयेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाचा डाव 19.4 षटकात सर्व बाद 143 धावात आटोपला. अभिषेक व्हण्णावरने 1 षटकार, 6 चौकारासह 33, नागेंद्र पाटीलने 1 षटकार, 2 चौकारासह 32, संतोष सुळगे पाटीलने 1 षटकार, 2 चौकारासह 22 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे दीपक नार्वेकरने 22 धावात 3, आकाश कटांबळेने 23 धावात 3, वसंत शहापूरकरने 39 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शंकर खासनीस, प्रशांत खासनीस, संजय चव्हाण, अनिकेत भिंगुर्डे यांच्या हस्ते सामनावीर, उत्कृष्ट झेल व सर्वाधिक षटकार पार्थ पाटील, इम्पॅक्ट खेळाडू अंगदराज हित्तलमनी यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सनी आहुजा, सुदर्शन जाधव, प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर शतक गुंजाळ, इम्पॅक्ट खेळाडू आकाश कटांबळे, सर्वाधिक षटकार नागेंद्र पाटील, उत्कृष्ट झेल आकाश पत्तार यांना चषक देवून गौरविण्यात आले.