Tarun Bharat

केकेआरची हैदराबादविरुद्ध विजयी ‘राईड’!

Advertisements

आयपीएल टी : शुभमन गिलचे दणकेबाज, नाबाद अर्धशतक, मॉर्गनसमवेत 92 धावांची अभेद्य भागीदारी

 वृत्तसंस्था / अबु धाबी

सारा तेंडुलकरच्या मैत्रीमुळे विशेष चर्चेत आलेला युवा फलंदाज शुभमन गिलने (62 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार) धडाकेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादला सहज धूळ चारली. प्रारंभी, 20 षटकात हैदराबादला 4 बाद 142 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखल्यानंतर केकेआरने 18 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. शुभमन व मॉर्गन यांची 92 धावांची अभेद्य भागीदारी येथे निर्णायक ठरली. विजयी चौकार फटकावणारा मॉर्गन 29 चेंडूत 42 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 3 चौकार, 2 षटकारांचा समावेश राहिला.

143 धावांच्या तुलनेने माफक धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलचे दमदार अर्धशतक वैशिष्टय़पूर्ण ठरले. सहकारी सलामीवीर नितीश राणाने 13 चेंडूत 26 धावा फटकावताना वसूल केलेले 6 चौकार देखील तितकेच लक्षवेधी होते.

सुनील नरेन अपयशी

प्रारंभी, सुनील नरेन मात्र खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. खलील अहमदच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील वॉर्नरने त्याचा झेल टिपला होता. कर्णधार दिनेश कार्तिक आणखी एक फिरकीपटू रशीद खानच्या गोलंदाजीवर पायचीत झाल्याने केकेआरच्या अडचणीत आणखी भर पडली. पण, एका बाजूने शुभमन गिलचा धडाका सुरुच राहिला. मुळातच किरकोळ धावसंख्या उभारणाऱया हैदराबादला त्याचे संरक्षण करणे अशक्य कोटीतील होते आणि अंतिमतः त्यावरच शिक्कामोर्तब झाले.

पांडेचे अर्धशतक

मनीष पांडे (51), डेव्हिड वॉर्नर (36) व वृद्धिमान साहा (30) यांच्या फटकेबाजीनंतर देखील सनरायजर्स हैदराबादला निर्धारित 20 षटकात 4 बाद 142 धावांवर समाधान मानावे लागले. केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने 7 गोलंदाजांना व्यवस्थित रोटेट करत हैदराबादला चांगलेच रोखून धरले. या हंगामात प्रथम फलंदाजी करणाऱया संघांमध्ये हैदराबादची ही धावसंख्या सर्वात निचांकी ठरली.

सनरायजर्स हैदराबादने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, इंग्लिशमन फलंदाज जॉनी बेअरस्टोचा 5 धावांवरच त्रिफळा उडाल्याने त्यांची खराब सुरुवात झाली. जलद गोलंदाज पॅट कमिन्सने अप्रतिम ऑफकटरवर त्याचा त्रिफळा उडवला. बेअरस्टोचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न येथे सपशेल फसला. कमिन्स मागील लढतीत बराच महागडा ठरला होता. मात्र, येथे डावातील चौथ्या षटकात बेअरस्टोचा बळी घेत त्याने आपण बहरात परतत असल्याचा जणू दाखला दिला.

डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 30 चेंडूत 2 चौकार व एका षटकारासह 36 धावा जमवल्या. मात्र, याचे मोठय़ा खेळीत त्याला रुपांतर करता आले नाही. युवा गोलंदाज वरुण चक्रवर्तीकडे परतीचा सोपा झेल दिल्यानंतर त्याला निराशाही लपवता आली नाही. मैदानावर बॅट आदळतच त्याने तंबूचा रस्ता धरला.

दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर मनीष पांडे व वृद्धिमान साहा यांनी मात्र एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर देत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. वॉर्नर दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी हैदराबादच्या खात्यावर 9.1 षटकात 2 बाद 59 धावा होत्या. त्यानंतर पांडे व साहा ही जोडी क्रीझवर जमली. प्रारंभी एकेरी दुहेरी धावाच घेतल्या असल्या तरी नंतर या उभयतांनी आक्रमण सुरु केले. वरुण चक्रवर्तीच्या वैयक्तिक चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर साहाने षटकारही खेचला.

प्रथमश्रेणी क्रिकेटचा अधिक अनुभव असलेल्या मनीष पांडेने 35 चेंडूत अर्धशतक साजरे केले व त्यानंतरही फटकेबाजीवरच त्याचा भर राहिला. 18 व्या षटकात केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलकडे गोलंदाजी सोपवला. दिनेश कार्तिकने या डावात चक्क 7 गोलंदाजांना संधी दिली. रसेलनेच डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडताना अर्धशतकवीर मनीष पांडेला परतीचा झेल घेत बाद केले. साहा पुढे 30 चेंडूवर धावचीत झाला. कमिन्स, वरुण चक्रवर्ती व रसेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. व गो. वरुण 36 (30 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. कमिन्स 5 (10 चेंडू), मनीष पांडे झे. व गो. रसेल 51 (38 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), वृद्धिमान साहा धावचीत (कमिन्स-कार्तिक) 30 (31 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मोहम्मद नबी नाबाद 11 (8 चेंडूत 2 चौकार), अभिषेक शर्मा 2 (3 चेंडू). अवांतर 7. एकूण 20 षटकात 4 बाद 142.

गडी बाद होण्याचा क्रम

1-24 (जॉनी बेअरस्टो, 3.6), 2-59 (वॉर्नर, 9.1), 3-121 (मनीष पांडे, 17.4), 4-138 (साहा, 19.2)

गोलंदाजी

सुनील नरेन 4-0-31-0, पॅट कमिन्स 4-0-19-1, शिवम मावी 2-0-15-0, कुलदीप यादव 2-0-15-0, वरुण चक्रवर्ती 4-0-25-1, कमलेश नागरकोटी 2-0-17-0, आंद्रे रसेल 2-0-16-1.

कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल नाबाद 70 (62 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), सुनील नरेन झे. वॉर्नर, गो. अहमद 0 (2 चेंडू), नितीश राणा झे. साहा, गो. नटराजन 26 (13 चेंडूत 6 चौकार), दिनेश कार्तिक पायचीत गो. रशीद खान 0 (3 चेंडू), इयॉन मॉर्गन नाबाद 42 (29 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार). अवांतर 7. एकूण 18 षटकात 3 बाद 145.

गडी बाद होण्याचा क्रम

1-6 (नरेन, 1.2), 2-43 (नितीश राणा, 4.4), 3-53 (दिनेश कार्तिक, 6.2).

गोलंदाजी

भुवनेश्वर कुमार 3-0-29-0, खलील अहमद 3-0-28-1, टी. नटराजन 3-0-27-1, रशीद खान 4-0-25-1, मोहम्मद नबी 4-0-23-0, अभिषेक शर्मा 1-0-11-0.

Related Stories

भारताचा 7 गडय़ांनी विजय, शॉ सामनावीर

Patil_p

बायर्न म्युनिचच्या सुलेला कोरोनाची लागण

Patil_p

गार्सिया हैद्राबाद एफसीशी करारबद्ध

Patil_p

ओसाकाचे विजयी पुनरागमन

Patil_p

तामिळनाडूकडे दुसऱयांदा मुश्ताक अली करंडक

Patil_p

भारतीय मल्लांना पहिला दिवस अपयशी

Patil_p
error: Content is protected !!