आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास प्रत्येक गोमंतकीयास दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, 24 तास अखंड वीजपुरवठा, थकीत वीजबिले माफ आणि शेतकर्यांना मोफत वीज देण्यात येईल, अशा पावरफुल घोषणा आपचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत. त्याद्वारे पुढील वर्षात राज्यात होणार्या विधानसभा निवडणूक प्रचाराचाहि त्यांनी अप्रत्यक्ष शुभारंभ केला. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी आपण केवळ राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. युती किंवा अन्य कोणताहि विषय त्यावेळी आला नाहि, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्यात आपण पुन्हा गोव्यात येणार असल्याचेहि ते म्हणाले. राज्यात स्वच्छ व पारदर्शक सरकार देण्याचे आश्वासनहि त्यांनी यावेळी दिले. हे केवळ निवडणुकीचे आश्वासन नव्हे तर ’आपण जे बोलतो ते करून दाखवतो’,अशी हमीहि त्यांनी दिली.
नेते,कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
मंगळवारी गोव्यात दाखल झालेल्या केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या भेटीत अनेक राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते, यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातून गोव्यातील विद्यमान राजकारणाला लोक प्रचंड कंटाळले असल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्याय म्हणून गोमंतकीय आपकडे आशेने पाहात आहेत व आपला चांगले भवितव्य असल्याचे स्पष्ट झाले, असे केजरीवाल यांनी पुढे सांगितले.
काँग्रेसने आमदार भाजपला विकले
भाजपला कंटाळलेल्या गोमंतकीयांनी बदलाच्या अपेक्षेने काँग्रेसला बहुमत दिले. त्यांचे 17 आमदार निवडून दिले तर भाजपचे केवळ 13 आमदार विजयी झाले. परंतु काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे आज 28 आमदारांसह भाजपच सत्तेत आहे. काँग्रेसने आपले आमदार भाजपला विकले व भाजपने सत्तेसाठी काँग्रेसचे आमदार चोरले. या दोन्ही पक्षांनी गोमंतकीयांचा केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वासघात आहे, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीकरांना आपचा चांगला अनुभव
अशा या विश्वासघातयांना गोमंतकीय कधीहि माफ करणार नाहि. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा बदलासाठी मतदान करणार आहेत. गोमंतकीयांना मतपरिवर्तन हवे आहे. दिल्लीतील काँग्रेसला आपने कसे सत्तेबाहेर काढले व स्वच्छ राजकारण आणले, जो विकास साधला, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यांचा अनुभव लोकांनी घेतला आहे. गोमंतकीयांनाहि आपकडून तीच अपेक्षा आहे, असे केजरीवाल म्हणाले.