Tarun Bharat

केनियात नाईट लाईफला कर्फ्यू, उद्योग, व्यवसाय सुरू

Advertisements

कोरोनाशी दिला यशस्वी लढा : शाळा, कॉलेज, जिल्हय़ांच्या सीमा बंदच :  कुडाळ सांगिर्डेवाडी येथील अजित राणे सांगताहेत नैरोबीतून अनुभव

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

केनिया अतिशय ‘ब्युटीफूल कंट्री’ आहे. वाईल्ड लाईफ टुरिझम, हॉर्टिकल्चर, चहा, कॉफी उत्पादन हे देशाचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्राsत. मात्र, 12 मार्च 2020 रोजी केनियामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर केनिया सरकारने 13 मार्चपासून तातडीने शाळा बंद केल्या. जिल्हय़ांच्या सीमा लॉक केल्या. 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली. सुमारे पाच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाने सायंकाळी 7 ते सकाळी 5 यावेळेत कर्फ्यू लागू केला. मात्र, दिवसभरात सर्व उद्योग, व्यवसाय सुरळीत सुरू ठेवले. नियोजबद्ध काम करत जिल्हाबंदीचे आदेश अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत केनियात केवळ 363 कोरोनाच्या केसेस आढळल्या असून पैकी केवळ 14 जणांचाच मृत्यू झाल्याचे मूळ कुडाळ सांगिर्डेवाडी येथील व गेली 25 वर्षे केनियात मल्टिनॅशनल कंपनीत ‘सीईओ’ म्हणून यशस्वी काम करत असलेले अजित तातू राणे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

कुडाळ येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जी. टी. राणे यांचे अजित राणे हे बंधू.  अजित राणे गेली 25 वर्षे केनियात राहतात. केनियात पाच वर्षे राहिल्यानंतर तेथील नागरिकत्व घेता येते. मात्र, आम्ही ते घेतलेले नाही. आम्हाला मायदेशातच परत येऊन देशसेवा करायची असल्याचे अजित राणे अभिमानाने सांगतात. राणे यांचे एक बंधू कॅनडा येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. दुसरे बंधू टांझानियात एका कंपनीत फायनान्स डायरेक्टर आहेत. राणे हे केनियाची राजधानी नैरोबी येथे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांची मुलगी तेथे एमबीबीएसला असून मुलगा दहावीत आहे. राणे यांचा जन्म कुडाळ येथे झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुडाळ हायस्कूलमध्ये बारावीपर्यंत व संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये त्यांनी बीकॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काहीकाळ मुंबईत टाटामध्ये काम केले. मात्र, त्यात ते समाधानी नव्हते. पुढे संधी मिळताच त्यांनी केनियात जाणे पसंत केले. महाविद्यालयीन जीवनात ते ए. टी. राणे म्हणूनच परिचीत होते.

12 मार्चला सापडला पहिला रुग्ण

कोरोनाबाबत बोलताना राणे सांगतात, केनियात सर्वप्रथम 12 मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर केनिया सरकारने गांभीर्याने घेत तातडीने पावले उचलली. 13 मार्चपासून शाळा, कॉलेज बंद करण्यात आली जी आतापर्यंत बंद आहेत. मात्र, ई लर्निंगच्या माध्यमातून घरातूनच शिकण्याचा पर्याय सुरू आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. आपला मुलगा दहावीत असून तो याच माध्यमातून क्लास अटेंड करत आहे.

सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सरकारने शॉर्ट टर्म नोटीस देत 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली. तसेच सर्व जिल्हय़ांच्या सीमा लॉक करण्यात आल्या. सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्हवर विलगीकरण करत उपचार व अत्यावश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. केनिया हे वाईल्ड लाईफ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे नाईट लाईफ एन्जॉय केले जाते. रेस्टॉरंट वगैरे रात्री सुरू असतात. मात्र, सरकारने सायंकाळी 7 ते सकाळी 5 या कालावधीसाठी कर्फ्यू लागू केला, जो आतापर्यंत सुरू आहे. मात्र, हे करत असताना केनियातील उद्योग, व्यवसाय, कार्यालये सुरळीत सुरू आहेत. जिल्हाबंदी असल्याने काही प्रमाणात अडचण असली, काही उद्योग-व्यवसायांना अडचण होत असली, तरीही ते बंद नाहीत. परिणामी बेरोजगारीचा प्रश्न तेवढासा येथे नाही. मात्र, पर्यटनावर परिणाम झाल्याने तो परिणाम निश्चितच जाणवेल. केनियाचा प्रमुख उद्योग व्यवसाय हा वाईल्ड लार्फफ पर्यटनावर आहे. त्यावर परिणाम निश्चितच जाणवतोय. केनियात हॉर्टिकल्चर एक्स्पोर्ट व्यवसायही मोठय़ा प्रमाणात चालतो. सध्या त्यावरही परिणाम झालेला आहे. केनियात चहा, कॉफीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मसाईमारा हे केनियातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याचे राणे सांगतात.

कोरोनाला रोखण्यात आज तरी यश

राणे सांगतात, केनियाची लोकसंख्या 5 कोटीच्या आसपास आहे. मात्र, 12 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर 27 एप्रिलपर्यंत तेथील एकूण रुग्णांची संख्या ही 363 एवढीच आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे व 110 जणांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे. एकूण स्थितीचा विचार केल्यास केनियाने रोजगार, उद्योग धंद्यांसाठी लॉकडाऊन न करता, कोरोनाला रोखण्यात मोठय़ा प्रमाणात यश मिळाल्याचे आज तरी म्हणता येईल.

भारतातही कोरोनाचा लढा निर्धाराने!

भारतही कोरोनाचा लढा मोठय़ा निर्धारपूर्वक लढत आहे. नागरिकांनी शासनाच्या सूचना, आदेशांचे पालन करावे. लॉकडाऊनच्या कालावधीत बाहेर न पडता घरी राहा, सुरक्षित राहा. लवकरच आपण सारेच यातून बाहेर पडू, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे गुणगौरव समारंभ संपन्न

Ganeshprasad Gogate

19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा ऋतिक सावंत कर्णधार

NIKHIL_N

नितेश राणेंना जेल की बेल?; आज होणार निर्णय

datta jadhav

दुचाकी अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

Patil_p

चिपळुणातील तीन तलाव झाले तुडुंब!

Patil_p

‘मिशन बंधारे’तून लाखो लिटर पाणी संचय!

Patil_p
error: Content is protected !!