Tarun Bharat

केन विल्यम्सनचे 24 वे कसोटी शतक

निकोल्ससमवेत अभेद्य द्विशतकी भागीदारी, दिवसअखेर न्यूझीलंड 3 बाद 286

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

कर्णधार केन विल्यम्सनने झळकवलेले दर्जेदार नाबाद शतक आणि हेन्री निकोल्ससमवेत त्याने केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडने दुसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशीअखेर 3 बाद 286 धावांची मजल मारली. पाकपेक्षा ते केवळ 11 धावांनी मागे असून पाकवर मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने ते वाटचाल करीत आहेत.

3 बाद 71 अशा स्थितीतून विल्यम्सन व निकोल्स यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 215 धावांची भागीदारी करीत संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून दिली आहे. पाकने पहिल्या डावात 297 धावा जमविल्या आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत अग्रस्थान पटकावलेला विल्यम्सन दिवसअखेर 112 धावांवर नाबाद असून त्याचे हे 24 वे कसोटी शतक आहे. त्याचा सहकारी निकोल्स 89 धावा काढून त्याला साथ देत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत विल्यम्सनने तीन कसोटीत तीन शतके झळकवली आहेत. येथील शतकावेळी त्याला नशिबाचीही साथ मिळाली. अखेरच्या सत्रात त्याला दोन जीवदाने मिळाली तर एकदा धावचीत होताना सुदैवानेच बचावला. चेंडूने बेल्सला स्पर्श केल्यानंतर ती किंचीत हलली. त्याचवेळी विल्यम्सनची बॅट क्रीझमध्ये आल्याने  तो नाबाद राहिला.

विल्यम्सनचे दर्जेदार शतक

2018 पासून पाकिस्तानला विदेशात एकही कसोटी जिंकता आलेली नाही. पण बिनबाद 52 वरून 3 बाद 71 अशी न्यूझीलंडची स्थिती झाली, तेव्हा त्यांना दैव आपल्याला साथ देत असल्याचे वाटले. उपाहारानंतर पाचव्या षटकात रॉस टेलर तिसऱया गडय़ाच्या रूपात बाद झाला. नंतर ती 4 बाद 74 अशी झाली असती. पण निकोल्स यष्टीमागे झेलबाद असल्याचा निर्णय डीआरएसनंतर फिरविण्यात आला. टीव्ही पंचांना शाहीन आफ्रिदीने टाकलेला चेंडू नोबॉल असल्याचे यावेळी दिसून आल्याने त्यांनी निकोल्सला नाबाद ठरविले. निकोल्स त्यावेळी 3 धावांवर होता. न्यूझीलंडची स्थिती नाजूक झालेली असताना विल्यम्सन मैदानात आला आणि त्याने सावध व संयमी खेळ करीत निकोल्सच्या साथीने हळूहळू डाव सावरला. तो इतका संयमाने खेळत होता की 20 धावांसाठी त्याने तब्बल 70 चेंडू घेतले. स्थिरावल्यानंतर मात्र त्याने गती वाढविली आणि पुढच्या 30 धावा त्याने केवळ 35 चेंडूत फटकावत अर्धशतक गाठले. त्यानंतर आणखी केवळ 35 चेंडूतच 24 वे शतक पूर्ण केले. त्याने एकाच षटकात चार चौकार ठोकत 78 वरून 94 धावांवर झेप घेतली होती.

निकोल्सने स्क्वेअरलेगला चेंडू टोलवत दोन धावा घेऊन 11 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आफ्रिदीचा नोबॉल किती महाग पडतोय, हे पाकच्या लक्षात आले असावे. टॉम लॅथम व टॉम ब्लंडेल यांनी अर्धशतकी (52) भागीदारी करीत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. खेळपट्टी कोरडी होत असली तरी पहिल्या दिवसाप्रमाणे त्यात बाऊन्स व मुव्हमेंट होती. न्यूझीलंडने याचाच फायदा घेत पाकला पहिल्या डावात 297 धावांत गुंडाळले होते. लॅथम-ब्लंडेल यांनी गार्डमध्ये बदल करीत क्रीझच्या पुढे स्टान्स घेतल्याने पाकच्या गोलंदाजांनाही लाईनमध्ये बदल करणे भाग पडले. फहीम अश्रफने पाकला पहिले यश मिळवून देताना आत वळलेल्या चेंडूवर ब्लंडेलला 16 धावांवर पायचीत केले तर पुढच्याच षटकात आफ्रिदीने लॅथमला झेलबाद केले.

चेंडू बॅटची कड घेत दुसऱया स्लिपमधील शान मसूदकडे गेला. पण त्याच्या हातून चेंडू निसटला. पण पहिल्या स्लिपमधील हॅरिस सेहेलने चपळाई दाखवत रिबाऊंड झालेला चेंडू अचूक टिपत लॅथमला माघारी धाडले. उपाहाराच्या आधी व नंतरच्या पाच षटकात पाकने भेदक मारा केल्याने न्यूझीलंडला फक्त 5 धावा करता आल्या होत्या. यावेळी टेलरचा झेलही मसूदने टिपला. पण नंतर अखेरच्या सत्रात विल्यम्सनचा एक अवघड झेल त्याला टिपता आला नाही. यावेळी तो 82 धावांवर होता. कर्णधार रिझवाननेही नंतर निकोल्सला 86 धावांवर जीवदान दिले.

संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 297, न्यूझीलंड प.डाव 85 षटकांत 3 बाद 286 : लॅथम 33, ब्लंडेल 16, विल्यम्सन खेळत आहे 112 (175 चेंडूत 16 चौकार), टेलर 12, निकोल्स खेळत आहे 89 (186 चेंडूत 8 चौकार), अवांतर 24. गोलंदाजी : आफ्रिदी 1-45, मोहम्मद अब्बास 1-37, अश्रफ 1-55).

Related Stories

चीनच्या लिजियावला गोळाफेकीत सुवर्ण

Patil_p

वेटलिफ्टर अचिंता शेऊलीला सुवर्ण

Patil_p

विश्रांतीला बगल देवून कोहली आयपीएलसाठी सज्ज

Patil_p

भारताचा बांगलादेशवर रोमांचक विजय

Patil_p

हदनाळच्या धावपटू विशालची आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेसाठी थायलंड येथे निवड

Archana Banage

बर्न्सचे शतक, इंग्लंड सर्वबाद 275

Patil_p