Tarun Bharat

केरळच्या 14 जिल्हय़ांमध्ये 9 महिला जिल्हाधिकारी

तामिळनातडून 11 महिला जिल्हाधिकारी – दिल्लीच्या 6 जिल्हय़ांमध्ये सुरक्षेची धुरा महिलेकडे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशामध्ये उच्चस्तरीय प्रशासकीय पदावर महिलांचे महत्त्व वाढू लागले आहे. अलिकडेच दिल्ली, तामिळनाडूनंतर केरळ या राज्यात उच्चस्तरीय पदांवर महिला अधिकाऱयांना जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. केरळच्या 14 जिल्हय़ांपैकी 9 ठिकाणी 9 महिला जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आणि त्याचे शेजारचे जिल्हे कोल्लम आणि पट्टणमथिट्टाचे प्रशासकीय नियंत्रण महिला जिल्हाधिकाऱयांच्या हातात आहे. कोट्टायम, इडुक्की, त्रिसूर, पलक्कड, वायनाड आणि कासरगोड जिल्हय़ाची धुरा देखील महिला जिल्हाधिकाऱयांकडे सोपविण्यात आली आहे.

केरळमध्ये उच्चस्तरीय प्रशासकीय पदांवर महिलांच्या नियुक्तीमुळे समाजात महिलांकरता अनुकूल वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे. केरळमध्ये महिला जिल्हाधिकाऱयांच्या नियुक्तीच्या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.

तामिळनाडूतही उल्लेखनीय स्थिती

तामिळनाडू सरकारने अलिकडेच 11 महिला अधिकाऱयांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. जिल्हाधिकारी पदांवर महिलांचे हे सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. या सर्व महिला अधिकारी अत्यंत सक्रीय असून सहजपणे जनतेच्या समस्या हाताळत असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे कौशल्य पाहूनच या महिला अधिकाऱयांना ही नियुक्ती मिळाली आहे.

दिल्लीत सुरक्षेची जबाबदारी

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच 15 जिल्हय़ांपैकी 6 ठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून महिला अधिकारी जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत तीन महिला डीसीपी होत्या, पण उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आणखीन तीन महिला अधिकाऱयांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. दिल्लीच्या 6 जिल्हय़ांमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून आता महिला अधिकारी दिसून येणार आहेत.

युपीएससीमध्ये मोठे यश

लोकसेवा परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण होणाऱयांमध्ये महिलांचे प्रमाण 28.3 टक्के इतके आहे. 2019 प्रमाणेच 2020 मध्ये देखील पहिल्या 25 जणांमध्ये 12 महिला आहेत. यंदा लोकसेवा परीक्षेत यशस्वी होणाऱया महिलांची टक्केवारी मागील तीन वर्षांच्या तुलनेत चांगली आहे. 2017 मध्ये 24.2 टक्के, 2018 मध्ये 23.9 आणि 2019 मध्ये 23.7 टक्के महिलांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षेत यश मिळविले होते.

Related Stories

अखिलेश यांना स्वप्नात दिसतात श्रीकृष्ण

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाच्या मेलमध्ये अवतरले मोदी!

datta jadhav

रहायचे नाही त्यांनी खुशाल पक्ष सोडावा!

Patil_p

पाकिस्तान सीमेजवळ मिग-21 कोसळले

Patil_p

पंतप्रधान मोदींमध्ये काशी-तामिळ संस्कृतीचे दर्शन

Patil_p

जुलैमध्ये जीएसटी संकलन 1.16 लाख कोटींवर

Patil_p