Tarun Bharat

कोकणातील मगरींच्या गावात निसर्ग पर्यटन बोट सफारी!

प्रतिनिधी चिपळूण

कांदळवनातील निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून मगरींचे दर्शन घडवून कांदळवन संवर्धनाचा वसा उचलणारे आणि मानव-मगर सहजीवनाचा सकारात्मक संदेश देणारे कोकणातील खेड तालुक्यातील एक गाव म्हणजे सोनगाव. याच गावात आता कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून मगर सफारी आणि कांदळवन संवर्धन पर्यटनाला चालना देण्यासाठी 8 आसनी बोट प्राप्त झाली आहे. मंगळवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर या वाशिष्ठी-मगर बोट सफारीचे उद्घाटन करण्यात आले.

  करंबवणे खाडीकिनारी वसलेल्या सोनगावसह आजूबाजूच्या परिसरात मगरींसह कांदळवन मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे गोवळकोट ते थेट मालदोलीपर्यंतच्या खाडी प्रवासात सोनगाव महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात आहे. तेथील मगरींचा अधिवास जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सोनगावमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून निसर्ग पर्यटनाचा उपक्रम सुरू केला आहे. वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई व कांदळवन कक्ष रत्नागिरी अंतर्गत गावात कांदळवन सह-व्यवस्थापन समिती स्थापन झाली आहे.

 या समितीमार्फत सोनगाव येथे वाशिष्ठी-मगर सफारी सुरू करण्यात येत असून त्यासाठी कांदळवन प्रतिष्ठान मुंबईकडून आठ आसनी मोटार बोट देण्यात आली आहे. भोईवाडी येथे मंगळवारी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाशिष्ठी-मगर सफारी बोटीचे शासकीय पद्धतीने उद्घाटन सरपंच भारती पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मगर सफारी करण्यात आली व मान्यवरांना कांदळवनाबद्दल माहिती देण्यात आली.

  कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांनी उपजीविका निर्माण योजना व पर्यटनाबद्दल मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. सरपंच पडवळ व उपसरपंच मिलिंद घोरपडे यांनी वाशिष्ठी मगर सफारी गटाला पर्यटन सुरु करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नितीन खेराडे, कांदळवन समिती अध्यक्ष राजाराम दिवेकर, वनपाल उपरे, वनरक्षक अशोक ढाकणे, उपजीविका तज्ञ वैभव बोंबले, उपजीविका सहाय्यक अभिनय केळसकर, प्रकल्प समन्वयक क्रांती मिंडे, गौरांग यादव, स्वस्तिक गावडे, निमिशा नारकर, पोलीस पाटील महेंद्र खासासे आदी उपस्थित होते.

Related Stories

सवणसमध्ये संक्शन पंप फोडून नदीत बुडवला – तहसीलदारांची कारवाई

Archana Banage

चाकरमान्यांच्या मदतीला धावले गावकरी

Patil_p

ॲड. सदावर्तेंना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

datta jadhav

अनुकूल हवामानामुळे मच्छीमारांच्या जाळ्य़ात मासळी!

Patil_p

ASI संभाजी बनसोडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

datta jadhav

कोरोना बाधीतांची संख्या 2 हजार पार

Patil_p