जागा देण्याच्या आदेश होण्याची मागणी, लवकरच निर्णयाची अपेक्षा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातील दोडामार्ग येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती प्रकल्पासाठी मंजुरी देऊनही अद्यापपर्यंत राज्य शासनाने जागा दिलेली नाही. या प्रकल्पासाठी त्वरित जागा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रत्नागिरीतील ज्येष्ठ विधीज्ञ विलास पाटणे यांनी ऍड. राकेश भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
भारत सरकारचा औषधी वनस्पती लागवडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंजूर केला. सातत्याने 2 वर्ष पाठपुरावा करूनही जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. राज्य सरकारने हा प्रकल्प जळगाव येथे करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र आयुष मंत्रालयाला दिले होते. परंतु आयुष संचालकांनी राज्य शासनाची ही मागणी फेटाळली आहे. जागतिक संघटनेने औषधी वनस्पतींसाठी पश्चिम घाट हा उपयुक्त मांडला आहे. त्या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने तिथे प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
2018 सालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांनी जागेची पाहणी करून तसा प्रस्ताव राज्य शासनास पाठवला आहे. ही जनहित याचिका 4 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सय्यद व जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस असता महाराष्ट्र सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले व जागा निश्चित करण्यात आली. त्या जागेची मालकी ही एमआयडीसीकडे असल्याने त्या विभागाच्या प्रमुखांकडे पत्रव्यवहार करत असल्याचे म्हटले आहे. या याचिकेवर ती पुढील सुनावणी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या खंडपीठापुढे पाठवण्यात आली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. कोकणामध्ये लवकरात-लवकर हा प्रकल्प व्हावा यासाठी रत्नागिरीतील ज्येष्ठ विधीज्ञ विलास पाटणे यांनी ऍड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.