Tarun Bharat

कोकणात शिवसेनेतील अस्वस्थता वाढतेय

कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या विरोधात टीकास्त्र सोडत आपली खदखद व्यक्त केल्यानंतर कोकणातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. अगोदरच राज्यात सत्तेवर असून आणि मुख्यमंत्रीपदी खुद्द पक्षप्रमुख असूनही शिवसैनिक समाधानी नसतानाच कदम यांनी उचललेल्या टोकाच्या भूमिकेमुळे आणि शिवसैनिक आणखी सैरभैर झाला आहे. 

मध्यंतरी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं दिसून येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्र असल्याचा खुलासा कदम यांनी त्यावेळी केला होता. मात्र त्या क्लिपनंतर कदम यांच्याविरोधातील अंतर्गत शत्रू पुढे सरसावले आणि त्यातूनच मग विधान परिषदेतून त्यांचा पत्ता कापला गेला. शिवसेनेने रामदास कदम यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारत त्यांच्या ऐवजी कोकणातीलच मूळचे चिपळूणचे व मुंबई वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र हे इथेच थांबले नाही. दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या ऐन धामधुमीत पालकमंत्री अनिल परब यांनी कदम समर्थकांचे पत्ते कापले. एवढेच नव्हे तर शिवसेनेने उत्तर रत्नागिरीतील कदम समर्थक पदाधिकाऱयांची हकालपट्टी करत नव्याने नियुक्त्या केल्या. कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे दापोली मंडणगड मतदार संघाचे आमदार आहेत असं असतानाही कदम समर्थकांना संघटनेच्या कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने कदम अस्वस्थ झाले. त्यातूनच मग मुंबईत पत्रकार परिषद घेत कदम यांनी अनिल परब हे रत्नागिरीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाले आहेत, ते शिवसेनेचे गद्दार आहेत, अशा तिखट शब्दांत  टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी वयोमानानुसार मला पक्षातील जबाबदाऱयांपासून दूर ठेवले असेल तर मग सुभाष देसाई हे अजून उद्योगमंत्री कसे, असा सवाल करतानाच व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून पक्षनिष्ठा शिकावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. याचबरोबर त्यांनी माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा उठवल्या जात आहेत, पण मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 

मुळातच कोकण हा शिवसेनेचा अभेद्य गड ओळखला जातो. गेल्या वीस वर्षांपासून कोकणात अगदी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते अगदी, आमदार, खासदारपर्यंत शिवसेनेचीच हुकूमत चालत आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण बदलत राहिले तरी कोकणात मात्र शिवसेना सोडून इतर राजकीय पक्षांना शिरकाव करता आलेला नाही. सिंधुदुर्गमधील नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र तो त्या जिह्यापुरता मर्यादित राहिला. बाजूच्या रत्नागिरी, रायगडमध्ये त्यांचा फार काही करिष्मा चालला नाही. पुढे कालांतराने शिवसेनेचे पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र असे असले तरी सध्या शिवसेनेतील वातावरण फारसे चांगले राहिलेले दिसत नाही

मुळात म्हणजे पक्षनेतृत्वाचे कोकणावर तितकेसे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. आजला नेते एका बाजूला आणि शिवसैनिक दुसऱया बाजूला. एकेकाळी होणारे भगवा सप्ताह, शिवसेना मेळावे शिवसैनिकांमध्ये जान आणत होती. आज मेळावे होतच नाहीत. झालेच तर गटांगटांचे… शिवसैनिकांशी संवादात अंतर पडले आहे. नेत्यांना थेटपणे भेटता येत नाही. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून सत्तेत आपला शिवसेना पक्ष असल्याचे शिवसैनिकांमध्ये समाधान असले ते स्वतः मात्र समाधानी नाहीत. सुरुवातीला बंडखोरी करण्यास कार्यकर्ता अथवा शिवसेनेचा लोकप्रतिनिधी धजावत नसे. आजच्या घडीला बंडखोरी केलेलाही निष्ठेच्या गोष्टी सांगत बसतो. त्यामुळे कुणाचा कुणाला मेळ नसल्याचे चित्र आहे. 

शिवसेनेतील या वातावरणातच सेना नेते रामदास कदम यांनी अन्य नेत्यांवर टीकास्र सोडत आपली खदखद व्यक्त केली असल्याने कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेतील वातावरण ढवळून निघाले आहे. कोकणातील एकाही नेत्याने कदम यांच्या वक्त्यव्यावर चकार शब्दही काढलेला नाही. नेत्यांबरोबरच आता शिवसैनिकही पुढे काय काय घडतंय याची वाट पाहत बसला आहे. शिवसेनेत मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या कदम यांचा कोकणात एकेकाळी फार मोठा दबदबा राहिला आहे. राणे यांनी 2005 मध्ये बंड केल्यानंतर त्याच्याविरोधात शिवसेनेने कदम यांच्यासारखा आक्रमक चेहऱयाला उभे केले. एकाचवेळी दहा शत्रू निर्माण करून त्यांना अंगावर घेऊ नये, हा राजकारणातील सोपा आणि सरळ नियम असताना त्यांनी विरोधकांना अंगावर घेण्याची खुमखुमी हे त्यांचे वैशिष्टय़. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शिवसेनेचे शिवसैनिक. मात्र याच कदमांना गेल्या सात वर्षांपासून रत्नागिरी जिह्याच्या शिवसेनेपासून दूर ठेवले गेले. मुंबईतून रवींद्र वायकर याना रत्नागिरीच्या पालकमंत्री म्हणून आणले असताना कदम यांना मात्र औरंगाबादला पाठवले. आताही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री स्थानिक नाही. स्थानिक आमदारांची संख्या मोठी असतानाही पालकमंत्री बाहेरचा. शिवसेनेतील घडामोडी नेमक्या कोण आणि कुणाच्या फायद्यासाठी करतोय हेच आजच्या घडीला सर्वसामान्य शिवसैनिक आणि जनतेला कळेनासे झाले आहे. यापूर्वी राणे गेले, कदाचित उद्या रामदास कदम यांनीही वेगळी भूमिका घेतली तर नवल वाटणार नाही. मात्र हे असे किती दिवस आणि कितीकाळ चालणार. कोकण आपला बालेकिल्ला असल्याने आपले काहीच नुकसान नाही या भ्रमात राहणे यापुढे कदाचित धोक्याचे ठरणार आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. पराभूत झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेही सध्या अडगळीत पडले आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रबळ होत चालली आहे. विकासनिधी राष्ट्रवादीकडे येत चालला आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीकडे आकर्षित होत  आहेत.

अशा परिस्थितीत मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. नेत्यांचे तळ्यात-मळ्यात असले तरी शिवसैनिक मात्र जाग्यावरच आहे. तो अजूनही निखाराच आहे. केवळ त्याला फुंकर घालण्याची गरज आहे.

राजेंद्र शिंदे

Related Stories

मुक्तपुरुष स्वतःच एक चालतंबोलतं तीर्थक्षेत्र असतो

Patil_p

लाल परीचे अश्रू

Patil_p

जी. एम. ऊसाची लागवड

Patil_p

नवी क्रांती

Patil_p

एशियन पेंटस्च्या निव्वळ नफ्यात वाढ

Patil_p

न्यू इंडिया…

Patil_p