Tarun Bharat

कोगनोळी टोलनाका परिसरात हायअलर्ट

प्रतिनिधी/ निपाणी

लॉकडाऊनमधून अंशतः वाहतूक सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहनांची वर्दळ वाढली असून कोगनोळी टोलनाक्यावर परराज्यातून मोठय़ा प्रमाणात वाहने येऊ लागली आहेत. मात्र त्यांना कर्नाटकात प्रवेश मिळविण्यासाठी पास उपलब्ध होऊपर्यंत तिथेच थांबावे लागत असल्याने टोलनाक्याच्या बंदोबस्तात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र, गोवा येथे जाण्यासाठी हा टोलनाका ओलांडावा लागतो. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर हा टोलनाका असल्याने येथे वाहनांची तपासणी झाल्यानंतरच दोन्ही राज्यामध्ये ये-जा करण्यासाठी वाहनांना प्रवेश मिळतो. मात्र सध्या कर्नाटक सरकारने सेवा सिंधू ऍपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या व त्यातून परवानगी मिळालेल्या प्रवाशांनाच राज्यात प्रवेश देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश येथून येणाऱया प्रवाशांना सेवा सिंधू ऍपच्या माध्यमातून कर्नाटकात येण्याची परवानगी मिळेपर्यंत कोगनोळी टोलनाक्यावर थांबविले जात आहे. त्यामुळे या नाका परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने यातून कोणताही धोका उद्भवू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

परराज्यातून आलेले नागरिक कर्नाटकात येण्यासाठी मिळणारा पास घेण्याकरीता या टोलनाका परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात गर्दी करत आहेत. तहसीलदार कार्यालय, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनातील 200 हून अधिक कर्मचारी याठिकाणी नागरिकांना सेवा देत असून प्रवाशांसाठी प्रशासनाकडून मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मिळालेल्या परवान्याची पडताळणी करण्याकरीता पोलीस खात्याचा मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. रात्रंदिवस पोलीस बंदोबस्तात येणाऱया वाहनांची कसून चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.

उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलीस उपअधिक्षक मनोजकुमार नाईक, सीपीआय संतोष सत्यनायक, ग्रामीणचे फौजदार बी. एस. तळवार यांच्यासह 300 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी या प्रवाशांवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय निपाणी नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, ग्रा. पं. कर्मचारी, शिक्षण खात्याचे अधिकारी, शिक्षक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय पथक देखील या नाक्यावर आपली सेवा बजावत आहेत.

Related Stories

एस. पी. घाळी ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

Amit Kulkarni

जानेवारी 19-26 दरम्यान बिग बाजारमध्ये ग्राहकांसाठी खास सवलत

Amit Kulkarni

शितल संघाकडे फार्मा क्रिकेट चषक

Amit Kulkarni

गोव्याचे राज्यपाल पिलाई यांना प्रबुद्ध भारततर्फे पुस्तक भेट

Amit Kulkarni

कोगनोळी नाक्यावर तीन शिफ्टमध्ये तपासणी

Patil_p

नियमबाहय़ वाहनधारकांवर कारवाईचे सत्र सुरूच…

Patil_p