तीनवेळचा चॅम्पियन युसेन बोल्ट आता निवृत्त झाला असून त्यामुळे 100 मीटर्स इव्हेंटमध्ये त्याची सिग्नेचर पोझ यावेळी पहायला मिळणार नाही. त्याच्या गैरहजेरीमुळे यंदा नवा चॅम्पियन असेल, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर दि. 1 ऑगस्ट रोजी होणाऱया या इव्हेंटमधील प्रबळ दावेदारांचा हा लेखाजोखा…
अमेरिकेचा ट्रेव्हॉन ब्रॉमेल


अमेरिकेचा जलद धावपटू टेव्हॉन ब्रॉमेलने फ्लोरिडात मागील महिन्यात 9.77 सेकंद वेळेचा नवा विक्रम नोंदवला आणि येथेच टोकियो ऑलिम्पिकसाठी आपण सज्ज असल्याचा दाखला दिला.
ब्रॉमेल यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स इव्हेंटमध्ये चक्क 8 व्या स्थानी फेकला गेला होता आणि त्यानंतर 4ƒ100 मीटर्स रिलेमध्ये तळपायाची दुखापत झाल्यानंतर ट्रकबाहेर जाण्याची नामुष्की त्याच्यावर आली होती. मात्र, आता तो पूर्ण बहरात आहे आणि अमेरिकेतील ट्रायल्समध्ये 9.80 सेकंद वेळेत इव्हेंट पूर्ण केल्याने त्याचे मनोबल उंचावले आहे. जस्टीन गॅटलिनने 2004 मध्ये अमेरिकेला सुवर्ण जिंकून दिले होते. तोच पराक्रम येथे गाजवण्याचा ब्रॉमेलचा प्रयत्न असणार आहे.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.77 सेकंद (जून 2021)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.77 सेकंद (जून 2021)
कॅनडाचा आंद्रे डी ग्रास्से


2016 रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता आंद्रे डी ग्रासे हा रिओमध्ये तिन्ही स्प्रिन्ट प्रकारात ऑलिम्पिक जिंकणारा कॅनडाचा पहिलाच ऍथलिट ठरला होता. 2017 व 2018 मध्ये तो दुखापतीमुळे बराचसा बाहेर राहिला. याचा त्याच्या कारकिर्दीवर विपरित परिणाम झाला. मात्र, 100 टक्के तंदुरुस्त असल्यास टोकियोत तो उद्या मुसंडी मारण्याची क्षमता राखून असेल.
यापूर्वी, 2019 दोहा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने 100 मीटर्समध्ये कांस्य जिंकले होते. शिवाय, 2017 मध्ये स्टॉकहोम येथे त्याने वारे अनुकूल दिशेने असताना 9.69 सेकंद अशी वेगवान वेळ नोंदवली आहे. साहजिकच, यंदा बोल्टच्या गैरहजेरीत त्याच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.90 सेकंद (सप्टेंबर 2019)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.92 सेकंद (मे 2021)
दक्षिण आफ्रिकेचा अकानी सिम्बाईन
अकानी सिम्बाईन हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात जलद धावपटू आहे. त्याने रिओमधील 100 मीटर्स इव्हेंटमध्ये पाचवे स्थान मिळवले होते. जुलैमध्ये हंगेरीत त्याने 9.84 सेकंद वेळ नोंदवली. ही वर्षातील दुसरी वेगवान वेळ ठरली.
2018 राष्ट्रकुल चॅम्पियन असलेल्या अकानीने एप्रिलमध्ये प्रिटोरियातील लीगमध्ये 9.82 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवला. आता टोकियोत विजेतेपद खेचून आणत 100 मीटर्स इव्हेंट जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन ऍथलिट ठरण्याचे त्याचे स्वप्न असेल.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.84 सेकंद (जुलै 2021)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.82 सेकंद (एप्रिल 2021)
अमेरिकेचा रॉनी बेकर


रॉनी बेकरने या वर्षात जागतिक स्तरावरील सर्वात तिसरी वेगवान वेळ (9.85 सेकंद) नोंदवली आहे. 2018 मध्ये वाऱयाचा वेग अनुकूल असताना त्याने 9.78 सेंकद वेळेत हा इव्हेंट पूर्ण केला होता. मागील 2 वर्षात दुखापतींचे ग्रहण मागे लागले असले तरी त्यावर वेळीच मात करण्यात तो यशस्वी ठरला. जूनमध्ये अमेरिकन ट्रायल जिंकत त्याने ऑलिम्पिक पदार्पण निश्चित केले.
गतवर्षी स्टॉकहोम व मोनॅको येथे लागोपाठ डायमंड लीग जिंकण्याचा पराक्रम त्याच्या खात्यावर आहे. याशिवाय, मोनॅको येथे त्याने ब्रॉमेल, डी ग्रासे व सिम्बाईन यांना पराभूत करत आपला वेग दाखवून दिला आहे. साहजिकच, टोकियोमध्ये तो प्रबळ दावेदारांपैकी एक असेल.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.85 सेकंद (जून 2021)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.85 सेकंद (जून 2021)
जमैकाचा योहान ब्लेक
लंडन 2012 ऑलिम्पिकमधील रौप्यजेता व माजी वर्ल्ड चॅम्पियन योहान ब्लेक हा देखील अनुभव पणाला लावून जीवाच्या आकांताने धावत विजेता ठरला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. योहान ब्लेक जर जिंकला तर बोल्टच्या गैरहजेरीत देखील 100 मीटर्सचे जेतेपद जमैकाकडेच राहणार आहे.
योहान ब्लेक यापूर्वी 2012 ऑलिम्पिकमध्ये पुरुष रिले सुवर्णजेत्या संघातील सदस्य राहिला होता. खडतर परिश्रम घेण्यावर त्याचा नेहमीच भर राहिला असून टोकियोत पोडियम फिनिश हेच त्याचे मुख्य लक्ष्य असणार आहे.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.69 सेकंद (ऑगस्ट 2012)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.95 सेकंद (जून 2021)
अमेरिकेचा प्रेड केर्ली
2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 400 मीटर्सचा कांस्य विजेता अमेरिकन प्रेड केर्ली याने यंदाच छोटय़ा इव्हेंटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्याने प्रयत्नांवर भर दिला. जूनमध्ये ऑलिम्पिक ट्रायलमध्ये त्याने तिसरे स्थान संपादन करत टोकियोसाठी पात्रता निश्चित केली. तेथेच त्याने आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ देखील नोंदवली.
आता प्रत्यक्ष टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक धडाकेबाज कामगिरी साकारण्याचे त्याचे लक्ष्य असणार आहे. मे महिन्यात त्याने डी ग्रासे व 2004 ऑलिम्पिक चॅम्पियन गॅटलिन यांना नमवत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.86 सेकंद (जून 2021)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.86 सेकंद (जून 2021)
जपानचा रायोता यामागाता
जपानचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर रायोता यामागातावर अवघ्या यजमान देशातील सर्व चाहत्यांच्या आशाअपेक्षा अवलंबून असणार आहेत. साहजिकच, या 29 वर्षीय ऍथलिटने हा विश्वास सार्थ ठरवला तर जपानसाठी हे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.
यामागातासाठी यंदा ही तिसरी ऑलिम्पिक असून रिओ ऑलिम्पिकमध्ये तो जपानच्या 4ƒ100 रिले संघाचा सदस्य होता. जपानने त्यावेळी रौप्य जिंकले होते. शिवाय, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यजेत्या संघाचा देखील तो सदस्य राहिला. जपानने आजवर 100 मीटर्स इव्हेंटमध्ये एकही पदक जिंकलेले नाही. ही परंपरा खंडित करण्याची नामी संधी रायोता यामागाताकडे असेल.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.95 सेकंद (जून 2021)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.95 सेकंद (जून 2021)
चीनचा बिंग्तियान सू
बिंग्तियन सू याच्यामुळे चीनला यंदा 100 मीटर्स फायनलमधील पदकाचे वेध लागले आहेत. आशियाई विक्रमधारक बिंग्तियान 10 सेकंदापेक्षा कमी वेळेत हा इव्हेंट पूर्ण करणारा जन्माने पहिला आशियाई ऍथलिट ठरला आहे. 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकणाऱया 4ƒ100 रिले संघाचा तो सदस्य राहिला. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने चौथ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.
वैयक्तिक सर्वोत्तम ः 9.91 सेकंद (जून 2018)
हंगामातील सर्वोत्तम ः 9.98 सेकंद (जून 2021)