Tarun Bharat

कोनेरु हंपीला 12 वे स्थान

मॉस्को / वृत्तसंस्था

शेवटच्या तीन फेऱयांमधील हॅट्ट्रिक पराभवामुळे भारतीय ग्रँडमास्टर कोनेरु हंपीच्या महिला विश्व रॅपिड व ब्लित्झ स्पर्धेतील दुसऱया जेतेपदाच्या स्वप्नाला मंगळवारी जोरदार सुरुंग लागला. दोन दिवस चाललेल्या ब्लित्झ स्पर्धेत पहिल्या दिवशी संयुक्त दुसऱया स्थानी असलेल्या कोनेरु हंपीला सलग अपयशामुळे चक्क 12 व्या स्थानी समाधान मानावे लागले.

रशियाची कॅटेरिना लॅग्नो व नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातील ब्लित्झ स्पर्धेतील आपले जेतेपद कायम राखले. यापूर्वी, शनिवारी हंपीने चीनच्या ली तिंग्जीविरुद्ध आर्मेगेडॉन लढत बरोबरीत राखत रॅपिडचे जेतेपद संपादन केले होते. त्यानंतर ब्लित्झमध्येही पहिल्या दिवशी 9 फेऱयांअखेर 7 गुणांसह ती संयुक्त दुसऱया स्थानी होती. पण, मंगळवारी दुसऱया व शेवटच्या दिवशी तोच बहारदार फॉर्म कायम राखण्यात तिला कमालीचे अपयश आले. तिला 17 सामन्यात केवळ साडेदहा गुणांची कमाई करता आली.

हंपीने दुसऱया दिवशी दोन डाव जिंकत स्पर्धेतील आपल्या कामगिरीच्या लौकिकाला साजेशी सुरुवात केली होती. या दोन विजयानंतर तिने दोन सामने बरोबरीत राखले आणि 13 व्या फेरीअखेर लॅग्नोसमवेत संयुक्त बरोबरी प्राप्त केली. यावेळी कोनेरु व लॅग्नो या उभयतांच्याही खात्यावर प्रत्येकी 10 गुण होते. पण, 14 व्या डावात कोनेरुला रशियाच्या ऍलिसा गॅलिमोव्हाविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली आणि इथे ती पहिल्या स्थानावरुन दुसऱया स्थानी पायउतार झाली. अर्थात, तिची खरी पडझड इथूनच सुरु झाली. कारण, शेवटचे तिन्ही सामने तिने सलग गमावले आणि यामुळे ती पाहता पाहता दुसऱया स्थानावरुन बाराव्या स्थानी फेकली गेली.

या स्पर्धेच्या रॅपिड गटाचे जेतेपद संपादन करणारी कोनेरु हंपी हिने 2016 ते 2018 या कालावधीत अपत्यप्राप्तीमुळे व्यावसायिक स्पर्धेतून ब्रेक घेतला होता. दरम्यान, या स्पर्धेत आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली महिलांच्या ब्लित्झ गटात 25 व्या स्थानी राहिली. लॅग्नोने मात्र दुसऱया दिवशी बहारदार खेळाची मालिका कायम राखत 9 पैकी 8 गुणांची कमाई केली आणि 17 सामन्यात 13 गुणांसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

युक्रेनची ऍना मुझीशूकने 17 डावात 12.5 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. चीनच्या टॅन झोंग्यी व रशियाच्या व्हॅलेन्टिना गुनिना यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळवले. या दोघींनीही प्रत्येकी 12 गुणांची कमाई केली.

Related Stories

देशातील हुतात्म्यांच्या आदर्शाची जपणूक करुयात..

Patil_p

टय़ुनिशियाचा फ्रान्सला धक्का, तरीही स्पर्धेबाहेर

Amit Kulkarni

महिला विश्वचषक पात्र फेरी सामने झिंबाब्वेत

Amit Kulkarni

दक्षिण आफ्रिकेची ‘चोकर्सची’ प्रतिमा कायम

Patil_p

भारतीय हॉकी संघाची फ्रान्सविरुद्ध सलामी

Patil_p

स्पेन-पोलंड लढत गोलबरोबरीत

Patil_p