Tarun Bharat

कोयना धरण 80 टीएमसीवर

Advertisements

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना धरणांतर्गत विभागात सध्या संततधार पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रातून प्रतिसेकंद 60 हजार 117 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ होत आहे. धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 80.45 टीएमसी झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 24.80 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचा जोर व पाण्याची आवक अशीच राहिली तर येत्या आठवडय़ाभरात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. मागील चोवीस तासांत पाणीसाठय़ात 4.97 टीएमसीने तर पाणीउंचीत 5.7 फूट वाढ झाली आहे. दरम्यान, सातारा शहरात चार दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले असून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. त्यामुळे सातारकरांना थोडासा दिलासा मिळाला.

 मंगळवार सायंकाळी पाच ते बुधवार सायंकाळी पाच या चोवीस तासांत कोयना- 189 मिलिमीटर, नवजा 146 मिलिमीटर व महाबळेश्वर 217 मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 80.45 टी. एम. सी., उपयुक्त पाणीसाठा 75.48 टी. एम. सी., पाणीउंची 2141.8 फूट, जलपातळी 652.780 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 24.80 टीएमसी पाण्याची गरज आहे.

    कोयना धरणांतर्गत विभागासह संपूर्ण पाटण तालुक्यातही पाऊस व वादळी वारे सुरू आहे. स्थानिक अनेक छोटय़ा-मोठय़ा नद्या, ओढे ,नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आगामी चार दिवसात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग होण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळी आठ ते सायंकळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 53 (2952) मिलिमीटर, नवजा येथे 26 (3656) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 77 (3785) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.तर बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 80.45 टीएमसी इतका झाला असून धरणात प्रतिसेकंद 60 हजार 117 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.

प्रथम पायथा वीजगृहातुन विसर्ग होणार

दरम्यान पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक वाढल्यास आणि पाण्याची आवक वाढली तर सुरुवातीला धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे पाणी सोडण्यात येईल. याबाबत योग्य त्यावेळी आवश्यक ती माहिती व खबरदारीचे आवाहन करण्यात येईल. तथापि अजून धरणात पाणी सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध असल्याने तूर्तास धरणातून विनावापर पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

सातारा शहरात उघडझाप

गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱया मुसळधार पावसाने बुधवारी थोडीशी उसंत दिली. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. त्यामुळे सातारकरांना थोडासा दिलासा मिळाला. पावसाची उघडीप मिळाल्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.

Related Stories

साताऱ्यात केंद्रीय विद्यालयासाठी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उदयनराजेंकडून निवेदन

Abhijeet Khandekar

शेतकरी कांदा दर वाढीच्या प्रतीक्षेत

Patil_p

मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात 3025 शौचालयांची कामे पूर्णत्वास

datta jadhav

सातारा हिल मॅरेथॉनचा उद्या होणार थरार!

Patil_p

जिह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

Patil_p

सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल…

datta jadhav
error: Content is protected !!