प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली. तिला साताऱयातून कोल्हापुरात घेऊन आलेली रूग्णवाहिका रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने जप्त केली. रूग्णवाहिकेच्या चालक, मालकाची सीपीआरमध्ये कोरोना तपासणी करण्यात आली. मंगळवारी सीपीआरमध्ये 150 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच चालकासह 50 जणांचे स्वॅब घेण्यात आले. ते सायंकाळी मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, त्या महिलेंच्या कुटुंबातील पाच जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मराठा कॉलनीतील 63 वर्षीय वृद्धा मुंबईला गेली होती. तेथून ती सातारा जिल्हय़ातील कोरेगाव तालुक्यात नातेवाईकांकडे गेली. तेथून तिला सातारा येथे सोडण्यात आले. लॉकडाऊन काळात 28 मार्च रोजी ती रूग्णवाहिकेतून कोल्हापुरात आली. कसबा बावडा परिसरातील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर शनिवारी ती सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिच्या स्वॅबचा रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला, त्यानंतर मंगळवारी मराठा कॉलनी परिसरात सर्वे करण्यात आला. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची सीपीआरमध्ये तपासणी करण्यात आली. तसेच ती ज्या रूग्णवाहिकेतून आली. त्या रूग्णवाहिकेच्या चालकाची कोरोना वॉर्डमध्ये तपासणी करण्यात आली. त्याचा स्वॅब घेतला असून त्याला आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल केले आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी देशांतर्गत प्रवास केलेल्या दीडशे जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 31 जणांचे स्वॅब घेण्यात आले. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये 7 जणांची तपासणी करून तिघांचे स्वॅब घेण्यात आले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 17 जणांची तपासणी करून 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले. ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील एकाचा स्वॅब घेण्यात आला. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील दोघांचे स्वॅब घेण्यात आले. जिल्हय़ात 175 जणांची तपासणी करून 50 जणांचे स्वॅब घेण्यात आले. ते मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
मराठा कॉलनीतील पॉझिटिव्ह महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तसेच संबधित डॉक्टराची तपासणी केली आहे. कुटुबियांसह परिसरातील 17 जणांच्या कोरोना स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


previous post