Tarun Bharat

कोरोनाचा काळ… खासगी सावकारीचा सुकाळ

गरीब-मध्यमवर्गीय अडकले सावकारी कर्जाच्या फेऱयात : त्रासाला कंटाळून अनेकांनी संपविले जीवन

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहर व उपनगरांना खासगी सावकारांचा विळखा वाढतो आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना 10 टक्के व्याजाने पैसे देऊन दिलेल्या पैशाच्या तीन ते चार पटीने वसूल करण्याचा सपाटा सुरू आहे. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेक जणांनी आपले जीवन संपविले आहे. तर अनेक जण या सावकारी कर्जातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत.

कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, उद्योग व्यवसायाला बसलेला फटका, नोकरी व व्यवसायावरील परिणामामुळे निर्माण झालेली आर्थिक अडचण, वाढती बेरोजगारी आदी कारणांमुळे गरीब, मध्यमवर्गीय, कामगार, कष्टकऱयांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. साहजिकच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मध्यमवर्गीय खासगी सावकारांकडे कर्जाची उचल करीत आहेत.

शहर व उपनगरांमध्ये सध्या सावकारी करणाऱया अनेकांकडे त्यासाठी आवश्यक परवाना नाही. कर्जदारांची सातत्याने पिळवणूक होत आहे. एखाद्या गरजू व्यक्तीने आर्थिक गरज भागविण्यासाठी खासगी सावकारांकडे 10 हजार रुपयांचे कर्ज घेतल्यास हजार रुपये व्याज कापून घेऊन 9 हजार रुपये दिले जातात.

कर्जदाराला एक पासबुक दिले जाते. त्या पासबुकवर भांडी, पंखा, खुर्ची, कुकर, खरेदी केल्याचा उल्लेख असतो. रोज 300 रुपये प्रमाणे 33 दिवस कर्जाची भरणा करावयाची असते. एक दिवस चुकला तर त्यांच्याकडून दंड आकारला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 हजार रुपयांच्या बदल्यात संबंधितांकडून कोरे चेक घेतले जातात. कर्जाची परतफेडीनंतर न्यायालयात खटला दाखल करण्याची धमकी देऊन कर्जदाराची पिळवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

10 हजार रुपयांच्या बदल्यात 30 हजार रुपये वसूल

खास करून शहापूर, वडगाव, अनगोळ, समर्थनगर, गांधीनगर, आझमनगर, जुने बेळगाव परिसरात असे प्रकार वाढले आहेत. झोपडपट्टी व गरीब आणि मध्यमवर्गीय वसाहतीत खासगी सावकारांचा वावर आहे. काही सावकार तर 10 हजार रुपयांच्या बदल्यात 30 हजार रुपये वसूल करताना दिसत आहेत. एकदा अशा खासगी सावकारांकडून कर्ज घेतले की आयुष्यभर ते कर्ज फिटत नाही. अशी स्थिती आहे.

खटला दाखल करण्याची धमकी

भांडी, कुकर, मिक्सर विकल्याचे सांगून पासबुकमध्ये एंट्री केली जाते. प्रत्यक्षात खरेदी विक्रीपेक्षा खासगी सावकारीचा हा प्रकार आहे. खासकरून महिलांना 10 हजार ते एक लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्यात येते. त्यांच्याकडून घेतलेले कोरे धनादेश दाखवत खटला दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे खासगी सावकारांच्या जाळय़ात कर्जदार महिला कायमच्या गुरफटून राहतात. एकाद्या कर्जदाराने धाडस करून विचारणा केली की त्यांच्यावर खटला दाखल करण्याची धमकी दिली जाते.

बेळगाव शहर व उपनगरांमध्ये असे प्रकार वाढले आहेत. खासगी सावकारांकडून कर्जदारांची अक्षरशः लूट सुरू आहे. खासगी सावकारी कर्जाला कंटाळून शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्यानंतर संपूर्ण राज्यात खासगी सावकारीबद्दल ठळक चर्चा झाली होती. सरकारने सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायदे केले होते. परवानगी घेतल्याशिवाय सावकारी करणाऱयांना अद्दल घडविण्यासाठी इच्छाशक्ती यापूर्वी सरकारने दाखविली होती.

आता शेतकऱयांच्या आत्महत्याप्रमाणेच खासगी सावकारांच्या कर्जामुळे गरीब मध्यमवर्गीय व कष्टकरी कर्जदारांवर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. कोऱया धनादेशामुळे खटला दाखल होईल या भीतीने कोणीच पोलिसांकडे दाद मागण्याचे धाडस करत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कर्जाचा भरणा करण्यास थोडासा जरी उशीर झाला तरी खासगी सावकारांनी पाळलेले गुंड कर्जदाराच्या घरासमोर येऊन ठाण मांडतात.

पोलिसांचे मात्र दुर्लक्षच

एकीकडे बेअब्रू होण्याची भीती, सावकारांकडून कोऱया धनादेशाचा वापर करीत खटला दाखल करण्याच्या भीतीमुळे सर्व काही सहन केल्याशिवाय कर्जदारांसमोर दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे अशा प्रकारची एकही तक्रार आली नाही, असे म्हणत नेहमीप्रमाणे बेळगाव पोलिसांचे मात्र दुर्लक्षच होत आहे. म्हणून खासगी सावकार चांगलेच माजले आहेत. त्यांच्या विळख्यातून गरीब मध्यमवर्गीयांना सोडविण्यासाठी पोलिसांना तत्परतेने काम करावे लागणार आहे.

Related Stories

सरडय़ांच्या अवयवांची तस्करी

Patil_p

तवंदी घाटात दोन अपघातात दोन ठार

Amit Kulkarni

दरवर्षी पूराचा फटका लोंढा येथील नागरिकांचा वाढतोय धोका

mithun mane

कोल्हापूर जिल्हय़ात पावसाचा कहर

Omkar B

आजही सरकारी बससेवा ठप्पच राहणार

Patil_p

स्थानिकसह लांब पल्ल्याची बससेवा सुरळीत

Amit Kulkarni