- दिल्लीत एका दिवसात 141 मृत्यू; तर 19,486 रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोनाने भयानक रूप धारण केले आहे. रोज नवे नवे उच्चांक गाठत आहेत. रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. तर अंतिम संस्कारासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत.
मागील आठ दिवसात दिल्लीत कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले आहेत. तर दररोज सरासरी 13 हजार लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. सक्रिय रुग्णांनी देखील 50 हजारचा आकडा ओलांडला आहे.
दिल्लीत 8 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या 6,98,005 इतकी होती. ती आता वाढून 8,03,623 इतकी झाली आहे. केवळ 8 दिवसात 1 लाख 5 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 8 दिवसात फक्त 67 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, राजधानी दिल्ली कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य बनले आहे. त्यामुळे सद्य स्थितीत दिल्लीत अधिक कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे.


त्यातच मागील 24 तासात तर मृत्यू संख्येने उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी 141 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी 131 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील 24 तासात 19 हजार 486 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 12,649 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
यासोबतच दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 लाख 03 हजार 623 वर पोहचली आहे. यामधील 7 लाख 30 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 11,793 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 61,005 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 60 लाख 43 हजार 160 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 64,939 आरटीपीसीआर टेस्ट आणि 34,018 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 19.69 % आहे. तर 9,929 झोन आणि 1300 कंट्रोल रूम आहे.