Tarun Bharat

कोरोनाचे रविवारी पाच बळी

नवे पॉझिटिव्ह रुग्ण 337 : कोरोनामुक्त रुग्ण 230 : एकूण मृत्यूचा आकडा 53

प्रतिनिधी / पणजी

कोरोनामुळे गेल्या 24 तासात पाच जणांना मृत्यू आला तर 72 तासात 11 जणांना कोरोनामुळे मृत्यू आला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या आता 53 झाली आहे, मात्र एकाच दिवशी पाच जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने जनतेमध्ये कोरोनाची धास्ती प्रचंड वाढली आहे. रविवारी गोव्यात तब्बल 337 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

वास्कोत सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. एका बाजूने रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसऱया बाजूने वास्कोत मृतांची संख्या वाढत आहे. 24 तासात वास्कोतील 4 रुग्णांना मृत्यू आला. वास्को भोवतीचा कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे वास्कोतील जनता भयभीत झाली आहे. वास्को आणि कुठ्ठाळी सध्या कोरोना हॉटस्पॉट बनले आहे.

रविवारी 230 जण झाले कोरोनामुक्त

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1809 वर पोहोचली आहे, तर रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 230 एवढी आहे. रविवारी बहुतेक सर्वच भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. वास्कोतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 401 झाली आहे, तर कुठ्ठाळीची रुग्णसंख्या 289 वर आली आहे.

चिंबलची रुग्णसंख्या 106 झाली आहे. पणजीची रुग्णसंख्या 77 तर म्हापशाची रुग्णसंख्या 63 वर पोहोचली आहे. डिचोली 11 व सांखळीची रुग्णसंख्या 42 झाली आहे. पेडणेची 18 तर वाळपईची रुग्णसंख्या 28 झाली आहे. हळदोणा 20, बेतकी 14, कांदोळी 36, कासारवर्णे 6, कोलवाळ 32, खोर्ली 18, शिवोली 19, पर्वरी 43 व मयेची रुग्णसंख्या 6 एवढी झाली आहे.

कुडचडे 18, काणकोण 7 तर मडगावची रुग्णसंख्या वाढून 121 वर पोहोचली आहे. बाळ्ळीची रुग्णसंख्या 56, कासावली 36, चिचिंणी 8, कुडतरी 43, लोटली 36, मडकई 22, केपे 19, सांगे 10, शिरोडा 22, नावेली 28 तर फोंडय़ाची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. अजून 1952 चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.

  • राज्यात 2 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित    6530
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                    4668
  • उपचार घेणारे सक्रिय रुग्ण                    1809
  • 2 ऑगस्टला दाखल झालेले नवे रुग्ण       337
  • 2 ऑगस्टला बरे झालेले रुग्ण                 230
  • 2 ऑगस्ट रोजी मृत्यू                5
  • आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या         53

फोंडा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

मयत व्यक्ती आडपई गावातील

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा तालुक्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. गोविंद नारायण नाईक (54) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो देसाईभाट-आडपई येथील आहे. रविवारी दुपारी 2.30 वा. सुमारास मडगाव येथील कोविड इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी 6.30 वा. फोंडा स्मशानभूमित त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देसाईभाट-आडपई वाडय़ावर दहा दिवसांपूर्वी 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तो भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तेथील शंभराहून अधिक लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते. मयत व्यक्तीला मुत्रपिंडाची बाधा असल्याने 24 जुलै रोजी गोमेकॉतील विलगीकरण विभागात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान 26 जुलै रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. आडपई भागात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मयत व्यक्तीसह दोघे रुग्ण सिम्टोमॅटिक तर उर्वरीत असिम्टोमॅटिक आहेत. 30 पैकी 8 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान फोंडा तालुक्यातील विविध पंचायत क्षेत्रामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 240 पर्यंत पोचली आहे. सध्या आडपई-आगापूर, कवळे पंचायत क्षेत्रातील पाऊणवाडा व धुमरे, बांदोडा पंचायत क्षेत्रातील गावणे तसेच कुर्टी, म्हार्दोळ, तिस्क उसगाव, बेतकी, मडकई, शिरोडा आदी भागात कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत. कुर्टी पंचायत क्षेत्रातील सिंधुनगर, मुनलाईट बार परिसर तर तिस्क उसगाव भागातील अवंतीनगर व सिद्धेश्वरनगर हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. हळदणवाडा-बेतकी येथील रुग्ण बरे झाल्याने तेथील कंटेनमेंट झोन रद्द करण्यात आला आहे. 

मुरगावात रविवारी कोरोनाचे चार बळी : आतापर्यंत तालुक्यातील बळींची संख्या 27

प्रतिनिधी / वास्को

रविवारी दिवसभरात वास्कोत तिघा कोरोना बाधीतांना मृत्यू आला, तर झुआरनगरमध्येही एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात झालेल्या चार मृत्यूमुळे मुरगाव तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 27 झाली आहे.

  रविवारी सकाळी वास्कोत कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. लगेच झुआरीनगरातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. संध्याकाळी नवेवाडेत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये झाले. नवेवाडेतील मृत्यू आलेल्या महिलेचे नाव सुलभा भगत (71) असे असून तिला सतरा दिवसांपूर्वी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मयत महिला नवेवाडे वास्कोतील रहिवासी आहे. नवेवाडेत आतापर्यंत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

 कोरोना पॉझिटिव्हचा हृदयविकाराने मृत्यू

 झुआरीनगरातील झरीन येथील एका व्यक्तीला कोरोनामुळे मृत्यू आला. मिळालेल्या माहितीनुसार मयताचे नाव उमर शेख (54) असे असून तो एका कॅन्टिनमध्ये कामाला होता. प्रथम केलेल्या कोविड चाचणीत तो निगेटिव्ह आला होता. मात्र, शनिववारी संध्याकाळी त्याच्या छातीत दुखी लागल्याने त्याला चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथून त्याला मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. परंतु त्याला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू आला. झुआरीनगरात आतापर्यंत चार जणांना कोरोनामुळे मृत्यू आलेला आहे.

 बायणात कोरोनाचे चार बळी

 बायणा भागातील एका महिलेचा कोरोनाने रविवारी सकाळी बळी घेतला. बायणातील या महिलेचे नाव पार्वती चलवादी (45) असे असून तिला व तिच्या सासुला कोरोना झाल्याने दोघांनाही मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान कोरोना बाधित झालेली तिची एक मुलगी कोरोनामुक्त झाली होती. त्यानंतर सासूसुध्दा कोरोनामुक्त झाली. परंतु सून पार्वतीला कोविड हॉस्पिटलमध्ये रविवारी मृत्यू आला. बायणात आतापर्यंत कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झालेला आहे.

खारवीवाडासह सडा, बोगदा, जेटी भागातही कोरोनाचे बळी

   हेडलॅण्ड सडय़ावरील जीआरबी कॉलनीमध्ये मागच्या आठवडय़ात दोघांचा बळी गेला होता. काल रविवारी पुन्हा एका 72 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सडय़ाच्या बोगदा व जेटी भागातही यापूर्वी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. वास्कोतील खारवीवाडा भागातही एका चौदा वर्षीय मुलीसह कोरोनाने चार जणांचा बळी घेतलेला आहे.

Related Stories

लंडनस्थित डिचोलीतील इसमाचा कोरोनामुळे मृत्यू

Omkar B

केजरीवालांचा रोजगार वर्षाव गोव्यात अशक्य

Amit Kulkarni

मंत्र्याचे वासनाकांड भाजपाला भोवणार

Amit Kulkarni

चिखली पंचायत क्षेत्रातील कचऱयाला हेडलॅण्ड सडय़ावरील लोकांचा विरोध

tarunbharat

नीलेश काब्राल यांची उमेदवारी दाखल

Amit Kulkarni

वाडे वास्कोतील तळय़ात उतरलेल्या म्हशीला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले

Amit Kulkarni