Tarun Bharat

कोरोनातही राजकारण

Advertisements

पावसाचे आगमन झाले आहे. पेरण्यांनी गती घेतली आहे. रोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ आणि कोरोना रूग्णवाढ सुरू आहे. हॉटस्पॉट वगळता इतरत्र अनलॉक एक अर्थात पुनश्च हरिओम सुरू आहे. पण, चिंता, काळजी, मृत्यूचे थैमान आणि कोरोना दहशत संपायला तयार नाही. हे किती दिवस चालणार हा विषाणू किती जणांचा व कशाकशाचा बळी घेणार याचा कुणालाच अंदाज नाही. कोरोना महिना चार महिन्यात आटोक्यात येईल असे वाटत होते पण  रूग्ण संख्या वाढते आहे. जगात आता भारत रूग्णसंख्येत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूग्णांची रोज वाढणारी संख्या पाहता तो आणखी कोणते स्थान मिळवतो ही भीती आहे. देशात समूह संसर्ग सुरू झाला असे काहींचे म्हणणे असले, तज्ञ तसा दावा करत असले तरी अद्याप अधिकृत घोषणा नाही. पण, देशातील सात आठ राज्यात आणि महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, सोलापुरात कठीण स्थिती निर्माण झाली आहे. वास्तव नाकारून ही लढाई जिंकता येणारी नाही. त्यामुळे वास्तव स्वीकारून संयमाने, शिस्तीने आणि नियमांचे पालन करूनच कोरोनावर मात करावी लागेल. देशात तीन लाख आणि महाराष्ट्रात एक लाख रूग्ण संख्या झाली आहे. रोज अकरा हजाराहून अधिक रूग्ण वाढत आहेत. रूग्ण बरे होण्याची संख्याही चांगली आहे. तथापि, नव्याने बाधित रूग्ण वाढत आहेत. हे दुष्टचक्र कधी थांबणार. जनजीवन पूर्वपदावर केव्हा येणार याची आस सर्वसामान्यांना लागली आहे. यंदा पंढरीची वारी नाही. पण, प्रथा मोडायची नाही म्हणून मर्यादित स्वरूपात पालखी प्रस्थान झाले आहे. माउली, तुकाराम रामकृष्ण हरिचा गजर हळू असला तरी तो महाराष्ट्रात घराघरात, शिवारात घुमतो आहे. यंदा घरीच वारी आणि विठ्ठलाची पूजा म्हणून एक झाड लावा जगवा असा वैष्णवांना फडकऱयांनी संदेश दिला आहे. आता वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचे पालन होणे महत्त्वाचे. पण पावसाळा आला आहे. आणि कोरोना घोंगावतो याचे भय अधिक आहे. त्यातच नवे आजार बळावत आहेत. थंडी ताप, सर्दी खोकला, अंगदुखी, फ्लू या पावसाळय़ात बळावणाऱया आजारांना आता प्रारंभ होईल असे दिसते आहे. कोरोनाची हीच लक्षणे आहेत. त्यामुळे भीती, संशय वाढणार हे सांगायला नको. आजही अनेक दवाखाने बंदसदृश आहेत. कोरोना दवाखाने त्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स यांची गोष्ट वेगळी आहे. पण किरकोळ आजार आणि तापाला आता डॉक्टर मिळणे आणि त्यासाठी दवाखान्यात जाणे दोन्ही अडचणीचे आहे. ओघानेच पुढचे काही महिने कठीण आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे या आरोग्य संकटात अगेसर राहून मैदानात उतरून लढताना दिसत आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे त्यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यामध्ये कोरोनावर परिणामकारक लस सापडल्याशिवाय आजची ही परिस्थिती बदलणार नाही असे म्हटले आहे. जगात आणि भारतातही लस व औषधोपचार यावर जोरदार संशोधन सुरू आहे. कुठे पहिल्या स्टेजला तर कुठे तिसऱया स्टेजला संशोधन पोहोचले आहे. सर्व आढावा घेता परिणामकारक लस जानेवारी 2021 नंतरच उपलब्ध होईल असा कयास आहे. म्हणजे हे वर्ष असेच जाणार आहे. हे वेगळे सांगायला नको. योगगुरु बाबा रामदेव यांनी आयुर्वेदात कोरोनावर रामबाण उपाय आहे असे म्हटले आहे पण त्यांची अनुमती व उपलब्धता हवी. आयुर्वेद, होमिओपॅथी, ऍलोपॅथी, युनानी यांचे दावे व दुकाने सुरू आहेत. पण खणखणीत, ठोस उपचार, औषध, लस असे काही होताना दिसत नाही. याचा परिणाम जगभर भीती दाटली आहे. कोरोनाची दहशत माजली आहे. अभूतपूर्व असे हे संकट घोंगावत असताना राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना राजकारण सुचते आहे. मग त्यासाठी नरेंद्र मोदी असोत, उद्धव ठाकरे असोत त्यांच्यावर टीकेची संधी सोडली जात नाही. अमेरिकेत तर नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष निवड आहे. तेथे व्यूव्हरचना आणि प्रचार अपप्रचार सुरू आहे. कोरोनाची सर्वात जास्त रूग्णसंख्या, बळींची संख्या अमेरिकेत आहे. उद्योग, व्यवसाय सारे अडचणीत आहे. शाळा बंद आहेत. रोज माणसे मरत आहेत. पण राजकारण जोरावर आहे. वर्णद्वेष उफाळला आहे. लॉकडाऊन वगैरे कुणी पाळायला तयार  नाही.  ट्रम्प विरोधी वातावरण जोर धरते आहे. अमेरिकेत तसे तर महाराष्ट्रात विधानपरिषद राज्यपाल नियुक्त जागांसाठी सत्तारूढ आघाडीत दबावाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आता नुकतेच कोरोनामुक्त झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळत नाही अशी तक्रार केली आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. निर्णयप्रक्रियेत आणि सत्तावाटपात समानसंधी हवी अशी काँग्रेसची भूमिका आहे. दिल्लीतून अनुमती असल्याशिवाय अशी टीका होणार नाही. भाजपाने मुंबईतील कोरोना रूग्ण आणि कोकणातले चक्रीवादळाचे नुकसान यावरून सरकारला धारेवर धरले आहे. उद्धव ठाकरे यांची तारेवरची कसरत सुरू आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचा विधानपरिषद जागांचा फॉर्म्युला ठरेल पण, तोपर्यंत वार, प्रहार होत राहतील. कोरोना संकट कितीही गहिरे असो राजकारण सुरू राहिल. माणसे कंटाळली आहेत. बेरोजगारी वाढली आहे. अनेकांना पगार कपातीला सामोरे जावे लागले आहे. जगण्यासाठीचा संघर्ष तीव्र होतो आहे. उत्तरोत्तर तो वाढणार आहे. मुंबई सुरळीत आणि पूर्वपदावर येत नाही तोवर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत राहणार आहे. जगात मंदीचे व बेरोजगारीचे वातावरण आहे. अनेकांना काम नाही. अशावेळी नवनवीन समस्या जोर धरतील. कायदा सुव्यवस्थाही अडचणीत येईल याचे भान ठेवून साऱयानीच या कठीण काळात देशहिताचे राजकारण साधले पाहिजे.

Related Stories

आनंदाच्या, उत्साहाच्या सणांची मालिका-दीपावली

Omkar B

आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति

Patil_p

पुलकित नाग्या

Patil_p

तूच सूर ठावा मजसी…

Patil_p

जबरदस्तीचे शिकार

Patil_p

भिजलेला फटाका आणि ऍटम बॉम्ब

Patil_p
error: Content is protected !!