Tarun Bharat

कोरोनानंतरचे बदलते काम आणि कामगिरी!

कोरोना काळानंतर बहुतांश जणांचे काम, कामाचे स्वरुप, कामकाज आणि कामगिरी यामध्ये लक्षणीय व मोठे बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. या बदलांमधील लक्षणीय बाब म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय व अद्ययावत अशा व्यवस्थापकीय व जबाबदारीच्या कामाला आता व्यक्तिगत क्षमतांसह महत्त्वाच्या अशा मानवीय पैलूंची आवर्जून जोड देण्यात येत आहे, हे विशेष.

याच बदल आणि बदलांचा दृश्य भाग सध्या आपल्याकडील व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या उभयतांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. परिणामी विद्यमान व्यवस्थापकच नव्हे तर विशेषतः नव्याने व्यवस्थापकीय वा जबाबदारीची पदांवरील उमेदवार-व्यक्तींची निवड करताना परंपरागत असे तंत्रज्ञान, कार्यपद्धती, अनुभव, संगणकीय पद्धतींचा अवलंब यांच्याच जोडीला उमेदवाराची व्यवस्थापकीय क्षमता, पात्रता पडताळून पाहण्यासाठी त्यांच्यातील निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, परस्पर संबंध, आव्हानपर स्थितीत काम करणे, समस्यांचा मागोवा वा पडताळा घेऊन त्यावर उपयुक्त तोडगा काढणे व मुख्य म्हणजे या साऱयासाठी आपल्या सहकाऱयांना प्रत्यक्ष संपर्काविना म्हणजेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने मार्गदर्शन करणे या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. किंबहुना नव्याने विशेषतः अधिकारी-व्यवस्थापक पदांवर उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची प्रत्यक्ष निवड करताना या महत्त्वपूर्ण मुद्दय़ांना पूर्वी कधी नव्हे एवढे महत्त्व प्राप्त होणे ही सुद्धा कोरोनाचीच करामत ठरली आहे.

साधारणतः कोरोनापूर्व काळात व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः व्यवस्थापक म्हणून काम करणाऱयांसाठी त्यांचे काम आणि कामकाजाशी संबंधित आकडेवारी, त्याचे आकलन-विश्लेषण हे फार महत्त्वाचे समजले जायचे. व्यवस्थापकांसाठी त्यांच्या व्यक्तिगतच नव्हे तर व्यावसायिक स्तरावरील निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित माहितीसह आकडेवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. विविध प्रकारच्या संगणकीय प्रणालींमुळे हे काम अधिक अचूक आणि उपयुक्त स्वरुपात केले जात असे. परिणामी या साऱयाच प्रक्रियेला मोठे महत्त्व लाभले होते.

आता मात्र या स्थिती आणि कार्यपद्धतीत मोठे बदल घडून आले आहेत. या बदलत्या व्यवस्थापन शैलीवर भाष्य करताना केपीएमजी या विख्यात व्यवस्थापन सल्लागार कंपनीचे माहिती व्यवस्थापन व्यवसाय प्रमुख सल्लागार अखिलेश तुटेजा यांच्यानुसार कोरोनानंतर विशेषतः कंपनी स्तरावर व उच्च व्यवस्थापनविषयक जबाबदारीचे काम करणाऱयांसाठी केवळ विस्तृत, विश्लेषणपर व अद्ययावत माहिती असणेच पुरेसे नसून या व्यावसायिक माहितीला कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक, विविध संस्था इत्यादीपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद क्षमता-कौशल्य, मानवी दृष्टिकोनासह उत्तम परस्पर संबंध या बाबींची फार गरज असते. या बाबी प्रकर्षाने जाणवल्या आहेत. त्यांच्या मते ज्या व्यवस्थापकांकडे वर नमूद केलेली व्यवस्थापन कौशल्ये प्रभावीपणे होती, अशांनी कोरोना दरम्यानची विविध आव्हाने आणि समस्यांवर यशस्वीपणे मात केलेली आहे.

त्यामुळेच केपीएमजी इंडियाने आपल्या व्यवस्थापन सल्ला सेवा विभागात नव्याने व्यवस्थापकांची निवड-नेमणूक करताना आता उमेदवारांच्या मुलाखत स्तरावरच त्यांच्या शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक प्रशिक्षण, संगणकीय क्षमता यांच्याच जोडीला त्यांच्या व्यवस्थापन विषयक क्षमता-पात्रतेची पडताळणी पारखून घेण्यावर विशेष भर दिला जात आहे. कंपनीच्या व्यवस्थापक निवडीच्या संदर्भातील या महत्त्वपूर्ण बदलाची पार्श्वभूमी म्हणजे कोरोनाने व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या उभयतांमध्ये पात्रता-क्षमता यांच्या जोडीलाच कामकाजातील व्यावहारिक लवचिकता ही बाब प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे व त्याचाच हा परिणाम आहे.

कर्मचारी-व्यवस्थापकांच्या निवड प्रक्रियेत प्रामुख्याने व विशेष भूमिका आणि जबाबदारी बजावणाऱया एचआर विभागाने पण कोरोनाच्या निमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रात घडून आलेल्या बदलांची वेळेत नोंद घेऊन त्यानुरुप आपले काम आणि बदल केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एचआर विभागाच्या कामकाजात कोरोनादरम्यान कर्मचारी-कामगारांशी निगडित विविध आव्हानपर समस्या, निर्बंध, अडचणी, प्रशासकीय अडचणी व त्यांची सोडवणूक एवढेच नव्हे तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती वैद्यकीय मदत, सल्ला व समुपदेशन अशा प्रकारची स्थित्यंतरे झाली असून ही बदल प्रक्रिया आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्यावर पण सुरूच आहे. मुख्य म्हणजे व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्या कंपन्यांमधील एचआर विभाग व व्यवस्थापकांनी वरील बदलांचा वेळेत व परिणामकारक स्वरुपात अवलंब केला अशा कंपन्यांमधील कर्मचारी-व्यवस्थापन या उभयतांना त्याचा फायदा झाला असून त्यांनी कोरोनावर प्रभावीपणे व यशस्वी स्वरुपात मात केलेली दिसते.

या संदर्भात आयबीएमचे भारत व दक्षिण आशिया क्षेत्रीय एचआर प्रमुख चैतन्य श्रीनिवास यांच्या मते आता या बदललेल्या स्थितीत व्यवस्थापकाला बदलाचे व्यवस्थापन यशस्वीपणे करणे ही बाब अपरिहार्य ठरते. याशिवाय या मंडळींकडे अनपेक्षित उद्भवणाऱया व्यावसायिक-व्यावहारिक स्थितीचा सामना करणे, गरजेनुरूप लवचिक भूमिका घेऊन स्थिती नियंत्रित करणे या बाबी पण विशेष महत्त्वाच्या झाल्या आहेत. श्रीनिवास यांच्यानुसार कोरोना काळातील या महत्त्वपूर्ण बदलांमुळे कंपनीअंतर्गत एचआर विभागाची भूमिका व जबाबदारीसुद्धा बदलली असून त्यांना आता व्यवस्थापनांतर्गत सल्लागार-मार्गदर्शकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडावी लागणार आहे.

याशिवाय आता कर्मचाऱयांची निवड-नियुक्ती करताना त्यांच्यात शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामकाजविषयक क्षमता यांच्याच जोडीला आव्हानपर भूमिका घेऊन व्यावसायिक गरजांनुरूप नव्या संदर्भासह-नव्या स्वरुपात काम करण्याची क्षमता पडताळून त्यानुरूप त्यांची निवड करण्यावर भर दिला जात आहे. बहुराष्ट्रीय कंपनी असणाऱया सनलाईफ एएससी (आशिया सर्व्हिसेस) या कंपनीने तर वरील निकषांसह कर्मचाऱयांची निवड करताना त्यांची मुलाखतपूर्व मानसशास्त्राrय चाचणीची नवी पद्धत सुरू केली, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.  या साऱया पार्श्वभूमीवर आयबीएम इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस व्हॅल्यूज या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रथितयश संस्थेने केलेल्या व्यापक सर्वेक्षणाद्वारे कोरोनानंतरच्या व्यवसाय, तंत्रज्ञान, कार्यपद्धती, व्यावसायिक आव्हाने व अस्थिरता, आर्थिक निकड, व्यवस्थापनचक्रातील झालेले बदल, कर्मचाऱयांच्या मनातील भीती व साशंकता या साऱयांवर उहापोह केला गेला व त्यानुरूप कंपन्यांच्या मुख्याधिकाऱयांची मते आणि मनोगत जाणून घेतले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजेच 35 टक्के मुख्याधिकाऱयांनी विशेषत्वाने नमूद केल्यानुसार कोरोनानंतरच्या अनपेक्षितपणे बदललेल्या व्यावसायिक परिस्थितीत कर्मचाऱयांपासून कंपनी-व्यवस्थापनापर्यंत सर्वच स्तरांवर मर्यादित स्वरुपातच नव्हे तर दीर्घकालीन संदर्भात आव्हानपर पद्धतीने व दूरस्थ व्यवस्थापन स्वरुपात काम करणे ही एक अपरिहार्य निकड ठरलेली असून देश-विदेश स्तरावरील या कंपनी मुख्याधिकाऱयांमधील या सर्वेक्षणाने पण कंपनीअंतर्गत सर्वांचीच बदलती कामगिरी आणि काम यावर नव्या संदर्भासह शिक्कामोर्तब झाले आहे, हे निश्चित.

दत्तात्रय आंबुलकर

Related Stories

अर्थसंकल्पाने आयकरदात्यांना चकविले!

Patil_p

प्रभु तू दयाळू कृपावंत दाता

Amit Kulkarni

ऐसा गोपींचा अमोघ प्रेमा

Patil_p

स्क्रिझोफेनिया नंतरही जीवन आहे…

Patil_p

जिभेची सत्ता

Patil_p

धुमसते काश्मीर

Patil_p