Tarun Bharat

कोरोनाने घेतली ‘आयपीएल’ची विकेट

‘बायो बबल’मध्येही विषाणूचा शिरकाव, खेळाडूंना संसर्ग झाल्याने स्थगितीचा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱया आणि खेळाडूंसाठी विशेषत्वाने निर्माण करण्यात आलेल्या ‘बायो बबल’ मध्येही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना या विषाणूचा संसर्ग झाल्याने आयपीएल स्पर्धेतील उरलेले सामने स्थगित करण्यात आले आहेत. ही स्पर्धा रद्द झालेली नसून केवळ लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने केले आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये आयपीएलच्या 3 संघांमधील चार खेळाडू, 1 प्रशिक्षक आणि 2 अन्य कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले होते. सोमवारी केकेआर संघाचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तर मंगळवारी सनरायजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू वृद्धिमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू अमित मिश्रा यांनाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. सीएसकेचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व अन्य दोन कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खेळाडू व इतरांच्या सुरक्षेसाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2 हजार कोटींचा तोटा

आयपीएल 2021 ही स्पर्धा पूर्ण झाली असती, तर बीसीसीआयला आणखी 2 हजार कोटी रूपयांची प्राप्ती झाली असती. आता ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ती पूर्णतः रद्द करावी लागली तर बीसीसीआयची 2 हजार कोटी रूपयांची हानी होण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

टी-20 वर्ल्डकपही अधांतरी

कोरोनाचे वाढते संकट पाहता याच वर्षी भारतात होणार असलेल्या टी-20 वर्ल्ड कपवरही अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. कोरोना नियंत्रणा न असल्यास आणि वातावरण पूर्वीसारखे न झाल्यास ही स्पर्धेचे भारताचे यजमानपद जाण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीने ही स्पर्घा भरविण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, भारत आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.

विक्रीतून होणाऱया नफ्यावर विरजण

यंदा ही स्पर्धा प्रेक्षकांविना भरविण्यात आली होती. त्यामुळे सामने सुरू असताना प्रेक्षकांकडून होणाऱया खाण्यापिण्याच्या वस्तूंची विक्री यंदा झाली नाही. या विक्रीतून बीसीसीआयला एकंदर उत्पन्नापैकी 20 टक्के उत्पन्न मिळत होते. यंदा ते मिळणार नव्हते. त्यामुळे बीसीसीआयच्या उत्पन्नाची सारी भिस्त जाहिरातींमधून मिळणाऱया उत्पन्नावरच होती. पण या उत्पन्नावरही स्पर्धा मध्येच स्थगित झाल्याने बीसीसीआयला पाणी सोडावे लागणार आहे.

खेळाडूंच्या सुरक्षित प्रवासासाठी…

स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने आता खेळाडूंसमोर सुरक्षितरित्या आपल्या घरी जाण्याचे आव्हान आहे. त्यांना याकामी बीसीसीआयचे व्यवस्थापन शक्य ते सर्व साहाय्य करणार आहे. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचविण्यासाठी बीसीसीआयने योजना तयार केली असून ती लवकरच क्रियान्वित होणार आहे.

बीसीसीआयच्या प्रतिष्ठेला धक्का

आयपीएल स्पर्धा स्थगित केल्याने बीसीसीआयची प्रतिष्ठा आणि या संस्थेच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’लाही धक्का लागणार आहे, असे बोलले जात आहे. 2020 मध्येही बीसीसीआयच्या ब्रँड व्हॅल्यू’ मध्ये 3.6 टक्क्यांची घट झाली होती. कोरोनाच्या धोक्यामुळे यंदा ही स्पर्धा प्रेक्षकांविनाच भरविण्यात आली होती. आता ती स्थगित करावी लागल्याचे दुःख आणि हानी मोठी आहे, असे सांगण्यात आले. तथापि, पुढील वर्षी सारेकाही सुरळीत होईल आणि आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ होईल अशी आशा बीसीसीआय बाळगून असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

क्लेशदायक निर्णय…

ड स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय क्लेशदायक पण अनिवार्य

ड स्पर्धा स्थगित केली असून रद्द केलेली नसल्याची स्पष्टोक्ती

ड बीसीसीआयची 2 हजार कोटी रूपयांची हानी होणे शक्य ड पुढील वर्षी सारे सुरळीत असल्यास ब्रँड व्हॅल्यूत वाढ शक्य

Related Stories

फिरकीचा चक्रव्यूह भेदण्याचे न्यूझीलंडसमोर आव्हान!

Patil_p

विद्यमान विजेते मुंबई यंदाही प्रबळ दावेदार

Patil_p

अँड्रीस्क्यू, शापोव्हॅलोव्ह, जोकोविच यांची आगेकूच

Patil_p

मणिपूरला हरवून पश्चिम बंगाल अंतिम फेरीत

Patil_p

रवि दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची ‘नहरी’ला प्रतीक्षा!

Patil_p

दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डीचे चॅम्पियन्स!

Patil_p