Tarun Bharat

कोरोनाबाधितांची संख्या 23 हजारावर

80 जिल्हय़ांमध्ये 14 दिवसांत नवा रुग्ण नाही, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 10 दिवस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आता 23 हजारांवर पोहचली आहे. गुरुवार संध्याकाळ ते शुक्रवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या कालावधीत नव्या 1,649 रुग्णांची भर पडून ही संख्या आता 23 हजार 124 वर पोहचली आहे. तर एकंदर मृत्यू 718 आहेत. नव्या 36 मृत्यूंची त्यात भर पडून संख्या 700 च्या वर केली. मात्र, समाधानाची बाब अशी की, 80 जिल्हय़ांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण नोंद झालेला नाही. तसेच 28 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण न सापडलेल्या जिल्हय़ांची संख्या आता 20 वर पोहचलेली आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी 778 नव्या रुग्णांची भर पडली. यातील बव्हंशी मुंबई, पुणे  व ठाणे या भागांमधील आहेत. या राज्यातील मृत्यूचा दर मात्र आता काही प्रमाणात घटू लागला आहे. महाराष्ट्रखालोखाल गुजरातचा क्रमांक असून येथे एकूण बाधितांची संख्या 2144 इतकी आहे. तर मृत्यूंची संख्या 92 आहे.

घाबरण्याचे कारण नाही

भारतात कोराना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आता ते एकंदर रुग्णसंख्येच्या 20 टक्के इतके आहे. एकंदर, 4 हजार 448 रूग्ण बरे झाले आहेत. तसेच विषाणूच्या प्रसाराचा दर एका व्यक्तीमागे 1.33 इतक्या पातळीवर आला आहे. पाच दिवसांपूर्वी तो 1.75 इतका होता. एकंदर, भारतातील परिस्थिती बरी असून घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले आहे.

प्लाझ्मा उपचार प्रभावी

दिल्लीत केंद्र सरकारने प्लाझ्मा उपचारपद्धतीला अनुमती दिली होती. त्याप्रमाणे चार रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. तो चांगल्यापैकी यशस्वी ठरल्याने आशेचा एक किरण दिसू लागला आहे. आता महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इतर दोन राज्यांमध्ये या उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आली आहे.

पुढील दोन आठवडे महत्वाचे

देशात कोरोनाचा आलेख झपाटय़ाने वर जात नसला तरी अद्याप संकट टळलेले नाही. तसेच कोरोना प्रसाराची साखळी पूर्णतः तुटलेली नाही. महानगरांमध्ये अद्यापही रुग्णसंख्या वाढतच असून ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे अत्याधिक महत्वाचे आहेत. या कालावधीत रुग्णसंख्या मर्यादेत राहिली तर या उद्रेकावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.

मध्यप्रदेशात संख्या स्थिरावली

मध्यप्रदेशात गेल्या आठवडय़ात रूग्णसंख्या झपाटय़ाने वाढली होती. तथापि, गेल्या तीन दिवसांमध्ये ती काही प्रमाणात स्थिरावल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच मृत्यूदरही प्रारंभीच्या भरानंतर आता नियंत्रणात असल्याचे दिसते. राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड व बिहार या राज्यांमध्ये स्थिती नियंत्रणा असल्याचे दिसते.

केरळची घोडदौड

केरळमध्ये कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आले असून तेथे नव्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन पोहचला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  

त्रिपुरा कोरोनामुक्त

गोवा आणि मणीपूरपाठोपाठ त्रिपुरा राज्याने कोरानामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. या राज्यात कोरोनाचे केवळ दोन रूग्ण होते. ते आता बरे झाले असून त्यांना गुरुवारीच घरी पाठविण्यात आले होते. गेल्या चोवीस तासांमध्ये या राज्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्रिपुरा हे कोरोनामुक्त होणारे तिसरे राज्य ठरले असून सिक्कीमही त्याच मार्गावर असल्याचे सांगण्यात येते.

आयआयटी विद्यार्थ्यांच्या किटला मान्यता

चीनमधून मागविलेली चाचणी सामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले होते. मात्र, दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक चाचणी सामग्री निर्माण केली असून ती 100 टक्के अचूक निदान करते असे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने या चाचणी सामग्रीला मान्यता दिल्याचे वृत्त आहे. या सामग्रीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यास भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल. मग आपल्याला विदेशी सामग्रीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता उरणार नाही.

Related Stories

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घाल्याने भाजपच्या तीन आमदारांचं निलंबन

Archana Banage

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून इंधन दरवाढीचे समर्थन

Archana Banage

राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

Archana Banage

9,136.89 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरण

Patil_p

आप खासदार भगवंत मान हे मद्यपी – सुखबीर बादल

Patil_p